आपल्या चित्रपटांसोबतच वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला रविवारी रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाइट बंद करत नऊ मिनिटांसाठी दिवा लावून एकतेचं दर्शन घडवण्याचं आवाहन केलं होतं. मोदींनी केलल्या आवाहनाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. सामान्य जनतेसह अनेक बॉलिवूडमधील मंडळींनीही आपल्या घराच्या गॅलरी, खिडकी, दरवाजात दिवा लावून एकतेचा संदेश दिला. काही कलाकरांनी दिवे लावतानाचे आपले फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले. पण, दिग्दर्शक राम गोपाल वर्माने मात्र जरा वेगळाच फोटो पोस्ट केला. त्यामुळे राम गोपाल वर्माची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास राम गोपाल वर्माने सिगारेट पेटवतानाचा फोटो ट्विट केला. या फोटोसोबत त्यांनी ‘धूम्रपानाबाबत सरकारच्या धोक्याच्या सूचनांचं पालन न करण्यापेक्षा करोनाबाबतच्या धोक्याच्या सूचनांचं पालन न करणं अधिक धोकादायक आहे’, अशा आशयाचं ट्विट केलं. शिवाय सिगारेट पेटवतानाचा एक व्हिडिओही पोस्ट केला. राम गोपाल वर्माने हे ट्विट केल्यापासून त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत असून ट्रोल करण्याचाही प्रयत्न होत आहे.

यापूर्वी एक एप्रिल रोजीही राम गोपाल वर्माने स्वतःला करोनाची लागण झाल्याचं ट्विट केलं होतं. पण, नंतर ‘डॉक्टरांनी मला एप्रिल फूल बनवलं’ असं दुसरं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यावरुनही नेटकऱ्यांनी राम गोपाल वर्मा यांना चांगलंच सुनावलं होतं.

Story img Loader