Ram Gopal Varma On Allu Arjun Arrest : हैदराबाद पोलिसांनी शुक्रवारी (१३ डिसेंबर २०२४ रोजी ) अभिनेता अल्लू अर्जुनला अटक केली. त्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा २: द रूल’च्या ४ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या प्रीमियरला अल्लू अर्जुनने हजेरी लावली होती. याचवेळी चेंगराचेंगरी झाली आणि एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात अल्लू अर्जुनवर कारवाई करण्यात आली. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा अल्लू अर्जुनच्या अटकेला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना जबाबदार असल्याचे मानत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
राम गोपाल वर्मा यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या माध्यमावर पोस्ट करत म्हटले की, “सर्वांनाच आश्चर्य वाटतं आहे की, आदरणीय मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अल्लू अर्जुनबरोबर असं का केलं. मला वाटतं, त्यांनी ही कारवाई ‘पुष्पा २: द रूल’चं दुसऱ्या आठवड्यातील कलेक्शन वाढवण्यासाठी केली.”
राम गोपाल वर्मा पुढे म्हणाले, “राज्य सरकारने मुद्दामहून कमकुवत पुरावे सादर केले, त्यामुळे अल्लू अर्जुनला काही तासांत जामीन मिळाला. त्यामागे अल्लू अर्जुन अधिक लोकप्रिय होईल आणि बॉक्स ऑफिसवर यश मिळवत राहील ही भावना होती.” त्यांनी शेवटी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे आभार मानत लिहिले, “धन्यवाद श्रीमान रेवंत रेड्डी. ”
Regarding everybody’s SURPRISE SHOCK about why the Honourable chief minister of TELANGANA @revanth_anumala did this to @alluarjun , I think it is because he wanted to give a BIG PUBLICITY BOOST to the telangana state’s FAVOURITE SON for a HUGE RISE in #Pushpa2 ‘s week 2 ‘s…
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) December 14, 2024
अल्लू अर्जुन अटक प्रकरणावर रेवंत रेड्डी यांचे स्पष्टीकरण
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी सांगितले की, या प्रकरणात राज्य सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही आणि कायद्याने त्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितले, “सगळे लोक त्याच्या अटकेबद्दल बोलत आहेत. पण चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं काय? तिचा मुलगा अजूनही कोमात आहे, तो बरा झाल्यानंतर त्याची आई कुठंय हे विचारेल, तेव्हा त्याला काय सांगायचं?अल्लू अर्जुनने चित्रपट बनवला आणि पैसे कमावले. त्याच्याशी सामान्य माणसाचे काहीच देणंघेणं नाही. अल्लू अर्जुननं सीमेवर जाऊन देशासाठी युद्ध केलं आहे का? मग त्याचा एवढा गवगवा कशासाठी?”
नेमके प्रकरण काय ?
४ डिसेंबर २०२४ रोजी अल्लू अर्जुनने ‘पुष्पा २: द रूल’च्या प्रीमियरसाठी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी प्रचंड गर्दी झाल्याने गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा लहान मुलगा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनाविरोधात एफआयआर नोंदवला आणि गर्दी नियंत्रित करण्यासाठी योग्य ती खबरदारी न घेतल्याचा आरोप केला.