शाहरुख खान आणि मनीषा कोइराला यांच्या ‘दिल से’ या चित्रपटाला नुकतीच २४ वर्षं पूर्ण झाली आहेत. २१ ऑगस्ट १९९८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारशी कमाल दाखवू शकला नसला तरी या चित्रपटाचं खूप कौतुक झालं. मणीरत्नम यांचं दिग्दर्शन, ए.आर. रहमान यांचं संगीत, गुलजार यांचे शब्द, संतोष सीवन यांचं चित्रीकरण यामुळे हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या मनात जागा करून आहे. पीयूष मिश्रा, गजराज राव, रघुवीर यादव यांच्यासारखे कित्येक कलाकार या चित्रपटाने आपल्याला दिले आहेत. यासगळ्यापेक्षा शाहरुख आणि मलायका अरोरा यांच्यावर चित्रित झालेल ‘छैय्या छैय्या’ हे गाणं प्रचंड गाजलं.

रहमानच्या करकीर्दीतलं ही सर्वोत्तम गाण्यांपैकी एक मानलं जातं. इशान्येकडे जाणाऱ्या चालत्या ट्रेनच्या टपावर या गाण्याचं चित्रीकरण झालं होतं. चालत्या ट्रेनवर संपूर्ण गाणं शूट करायचा हा पहिलाच धाडसी प्रयोग होता. याच गाण्यासंदर्भात दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी बॉलिवूड हंगामा या मनोरंजन विश्वाशी निगडीत असलेल्या साईटशी संवाद साधताना खुलासा केला.

राम गोपाल वर्मा यांनी सांगितलं की ‘दिल से’मध्ये ‘छैय्या छैय्या’ हे गाणं पहिल्या १५ मिनिटांत पडद्यावर येतं, त्यावेळेस कित्येक प्रेक्षक हे गाणं ऐकण्यासाठी येत आणि हे गाणं झालं की चित्रपटगृहाच्या बाहेर पडत असत, यामुळे चित्रपटगृहाच्या इतर गोष्टींच्या विक्रीवर परिणाम होत होता.

‘दिल से’ या चित्रपटाची निर्मिती मणीरत्नम, शेखर कपूर आणि राम गोपाल वर्मा या तिघांनी मिळून केली होती. तसेच भरत शाह या त्यावेळच्या सर्वात मोठ्या चित्रपट प्रदर्शकाने या चित्रपटाची जवाबदारी घेतली होती. एकंदरच ‘छैय्या छैय्या’ गाण्यामुळेच चित्रपटाची हवा तयार झाली होती, पण या कथेचा शेवट फार दुखद होता. चित्रपटाच्या शेवटी शाहरुखसारख्या मोठ्या स्टारला मरताना बघणं हे त्याकाळातील प्रेक्षकाला रुचणारं नव्हतं. शाहरुखच्या पात्राला मारल्यामुळे या चित्रपटावर नकारात्मक परिणाम झाला होता हे खुद्द राम गोपाल वर्मा यांनीही मान्य केलं होतं.

आणखी वाचा : या अभिनेत्याबरोबर ‘छैय्या छैय्या’ गाण्यावर पुन्हा एकदा थिरकली मलायका अरोरा, व्हिडीओ व्हायरल

चित्रपटातली सर्वात मुख्य आणि आकर्षणाची गोष्ट होती ती म्हणजे ‘छैय्या छैय्या’ हे गाणं. बऱ्याच चित्रपट वितरकांनी तेव्हा निर्मात्यांकडे हे गाणं मध्यांतरानंतर ठेवावं अशी विनंतीदेखील केली होती. खुद्द चित्रपट प्रदर्शक भरत शाह यांनी राम गोपाल वर्मा यांच्याकडे ही विनंती केली होती की ‘छैय्या छैय्या’ हे गाणं चित्रपटाच्या शेवटी यायला हवं.

अखेर मणीरत्नम हे चित्रपटाचे दिग्दर्शक होते. त्यांनी यामध्ये काहीच बदल केला नाही. पण बऱ्याच चित्रपटगृहाच्या मालकांनी तसेच वितरकांनी ‘छैय्या छैय्या’ हे गाणं एडिट करून मध्यांतरानंतर आणि शेवटीदेखील दाखवलं आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवायचा प्रयत्न केला आणि काही बाबतीत त्यांना यात यशही मिळालं.

Story img Loader