मागच्या काही काळापासून चित्रपटसृष्टीत दाक्षिणात्य चित्रपटांचीच चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपट जोरदार कमाई करताना दिसत आहेत. त्यानंतप आता राष्ट्रीय भाषेवरुन दाक्षिणात्य कलाकार आणि बॉलिवूड कलाकारांमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हा संपूर्ण वाद सुरु झाला आहे. यावेळी त्याने हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणनं त्याला ट्विटरवरून उत्तर दिलं होतं आणि आता या वादात प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी देखील उडी घेतली आहे. एवढंच नाही तर या वादावरून त्यांनी बॉलिवूड कलाकारांना सुनावलं आहे.
अजय देवगण याने काही तासांपूर्वी एक ट्विट केले होतं. त्यानं लिहिलं. ‘किच्चा सुदीप…, जर तुमच्या मते हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, तर मग तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता? हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि नेहमीच असेल. जन गण मन’ यावर किच्चा सुदीपनंही त्याला उत्तर दिलं होतं, ‘तुम्ही हिंदीमध्ये केलेलं ट्वीट मला समजलं. कारण मला हिंदी भाषा येते. मी या भाषेचा आदर करतो. पण जर मी हेच उत्तर कन्नडमध्ये दिलं असतं तर तुम्हाला काय समजलं असतं?’
आणखी वाचा- कोणाला विसरू इच्छिते कियारा आडवाणी? ब्रेकअपच्या चर्चांनंतर अभिनेत्रीचं उत्तर चर्चेत
या दोघांच्या वादावर आता दिग्दर्शक रामगोपाल वर्मानं एकामागोमाग एक ट्वीट करत आपलं मत मांडलं आहे. यासोबतच त्यानं किच्चा सुदीपला पाठिंबा देत बॉलिवूड कलाकारांना सुनावलं आहे. त्यानं लिहिलं, ‘किच्चा सुदीप तुझ्या प्रश्नपेक्षा उत्तम कोणतीच गोष्ट असू शकत नाही. काय झालं असतं जर तू एका हिंदी ट्वीटचं उत्तर कन्नडमध्ये दिलं असतं? अजय देवगण मानलं तुला आणि मला आशा आहे की सर्वांना माहीत असेल की ते कोणीही उत्तर किंवा दक्षिण भागातील नाही तर भारतीय आहेत.’
आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये राम गोपाल वर्मानं थेट बॉलिवूडच्या कलाकारांना सुनावलं आहे. त्यानं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘सुदीप किच्चा सर, हे खरं आहे की, बॉलिवूड कलाकारांना दाक्षिणात्य कलाकांरांबद्दल ईर्षा वाटते. कारण कन्नड डबिंग चित्रपट ‘KGF2’ने ५० कोटीची ओपनिंग कमाई केली होती आणि अलिकडेच प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांकडे पाहिलं तर दोन्हीतील फरक स्पष्ट दिसून येतो.’
नेमकं प्रकरण काय?
दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपने ‘R’-The Deadliest Gangster Ever या चित्रपटाच्या लाँचिंगला हजेरी लावली होती. यावेळी त्याने दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत? या सलमान खानच्या प्रश्नाला उत्तर दिले होते. तो म्हणाला की, “दाक्षिणात्य दिग्दर्शक सध्या अशा चित्रपटांची निर्मिती करत आहे ज्याचे जागतिक स्तरावर अस्तित्व असेल. बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक निर्माते हे तेलुगू आणि तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्याचे प्रमाण फार कमी आहे.”
आणखी वाचा- यशला KGF करायचा नव्हता हिंदी भाषेत प्रदर्शित पण… वाचा नेमकं काय घडलं
“सध्या दक्षिणेत अनेक चित्रपटांची निर्मिती होत आहे, असे तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात. पण मला त्यात एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. तर सध्या संपूर्ण सिनेसृष्टी ही विविध भाषांवर चित्रपटांची निर्मिती करताना दिसत आहे. अनेक बॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक तेलुगू, तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्यांना त्यातून हवे तितके यश मिळत नाही आणि त्याउलट आज आम्ही सर्वत्र चालणारे चित्रपट बनवत आहोत”, असे दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपने म्हटले आहे.