‘रामलीला’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे हा चित्रपट ठरलेल्या दिवशी म्हणजे १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.  अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीरसिंग यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. मात्र, चित्रपटाच्या नावाला आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर निर्माता संजय लीला भन्सालीला नोटीस बजावण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
रामलीला नावामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा दावा करणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र रामलीला मंडळाचे उपाध्यक्ष शुक्‍ला यांनी ‘रामलीला’ नावाला विरोध केला आहे. मात्र, श्रीरामाची प्रतिमा लोकांच्या मनात आहे आणि त्याला कोणीही तडा देऊ शकलेले नाही, असे न्या. विद्यासागर कानडे म्हणाले. तसेच भन्सालीसह सर्व पक्षकारांना नोटीस बजावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. या याचिकेवर पुढील सुनावणी १९ तारखेला होणार आहे.
चित्रपटाचे नाव हे रणवीर आणि दीपिका यांनी चित्रपटात केलेल्या भूमिकांवर आधारित आहेत. त्याचा रामलीला किंवा रासलीलेशी कोणताही संबंध नसल्याचे दिग्दर्शक संजय लीला भन्सालीने म्हटले आहे.

Story img Loader