पेशव्यांचे राजकारण, कर्तबगारी यावर बरेच लेखन झाले आहे. ‘स्वामी’ या कादंबरीमुळे आणि त्याच नावाच्या दूरदर्शनवर गाजलेल्या मालिकेमुळेही मराठी रसिकप्रेक्षकांना माधवराव पेशवे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांच्याबद्दल बरीचशी माहिती आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा चित्रपटातून मांडण्याचे आव्हान दिग्दर्शकाने पेलणे हे कौतुकास्पद ठरते. परंतु माधवराव -रमाबाई यांच्या सहजीवनाचा कालावधी अतिशय अल्प असल्यामुळे ‘रमा माधव’ या चित्रपटातून ही प्रेमकहाणी उलगडताना काहीतरी राहून गेले असे वाटत राहते. त्या अर्थाने ती अधुरी प्रेमकहाणी ठरते.
मराठय़ांचा इतिहास मराठी जनांना ढोबळमानाने ठाऊक असला तरी एक मात्र खरे की ‘राऊ’ आणि ‘स्वामी’ या दोन मालिका जेव्हा प्रसारित झाल्या तेव्हाचा प्रेक्षक आणि आता नवीन पिढीतील प्रेक्षक यात खूप अंतर आहे. म्हणूनच नवीन पिढीतील प्रेक्षकांसाठी चित्रपटातून माधवराव पेशवे, त्यांचे राजकारण, त्यांची कर्तबगारी आणि त्यांचे व रमाबाईंचे सहजीवन पाहणे हे नवीन आहे. या विषयाच्या अनुषंगाने मराठय़ांच्या इतिहासाची उजळणी दृक्श्राव्य माध्यमातून झाली आहे ही बाबही महत्त्वाची ठरते. रंगभूषा, वेशभूषा, काळ उभा करण्यासाठी केलेले नेटके कला दिग्दर्शन, पेशव्यांचा राजेशाही थाट दाखविण्यासाठी केलेल्या सगळ्या गोष्टी आणि त्यांचे उत्तम छायालेखन यामुळे चित्रपट निश्चितच चकाचक, देखणा झाला आहे.
लेखक-दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या शीर्षकातूनच चित्रपट रमाच्या दृष्टिकोनातून बनविल्याचे सूचित केले आहे. त्यामुळे छोटी रमा खेळतेय इथपासूनच चित्रपटाला सुरुवात होते. तिचा बालविवाह पेशव्यांच्या पुत्राशी झालेला आहे एवढेच तिला बालवयात माहीत आहे. बालवयातील रमा नऊवारी साडी नेसून पहिल्यांदा शनिवारवाडय़ात प्रवेश करते आणि अतिशय अल्प वयातच तिच्यावर मोठी जबाबदारी पडते. पानिपतावरील पराभवामुळे खचलेले व विश्वासरावांच्या मृत्युमुळे निराश झालेले नानासाहेब पेशवे मरण पावतात आणि माधवरावांकडे अतिशय अल्पवयात पेशवेपद येते. मोठी झालेली रमा आणि माधवराव यांचे एकत्र घालविलेले निवांत, विरंगुळ्याचे क्षण आणि माधवरावांच्या नेतृत्वाखाली पेशव्यांनी केलेल्या लढाया असे दोन भाग चित्रपटात आहेत. यामध्ये राजकीय इतिहास दाखविण्यातून चित्रपट चित्तवेधक झाला असला तरी चित्रपटाच्या शीर्षकानुसार अपेक्षित असलेले रमा आणि माधवराव यांचे सहजीवन, त्यांच्यातील प्रेमाचे नाते झाकोळले गेले आहे किंवा फार कमी प्रसंगांतून दाखविले आहे. त्यामुळे त्यांची प्रेमकहाणी अधुरी वाटते. आयुष्यभर सहवास सातत्याने लाभला नसला तरी माधवरावांचा क्षयरोग बळावल्यानंतर त्यांची शुश्रूषा करतानाचे प्रसंग आणि मृत्यूनंतर तो मिळावा म्हणून रमा सतीची प्रथा नसतानाही सती जाण्याची तयारी करते यातून दिग्दर्शकाने उभयतांचे प्रेमळ नाते उलगडले आहे.
माधवराव, विश्वासराव आणि धाकटे नारायणराव, त्यांच्या मातोश्री गोपीकाबाई, वडील नानासाहेब पेशवे, बंधू रघुनाथराव ऊर्फ राघोबादादा आणि चुलतबंधू सदाशिवराव भाऊ , तसेच आनंदीबाई, पार्वतीबाई या सगळ्या प्रमुख व्यक्तिरेखा आणि त्यासाठी केलेली कलावंत निवड ही दाद देण्याजोगी आहे. सबंध चित्रपटात राघोबादादा आणि पर्यायाने त्यांच्या पत्नी आनंदीबाई याच व्यक्तिरेखा खलनायकी आहेत असे दाखविले आहे. माधवरावांवर पेशवेपदाची जबाबदारी आल्यानंतर राजकारण आणि लढाया यात त्यांचे उर्वरित आयुष्य खर्ची पडले हे चित्रपटातून चांगल्या पद्धतीने दाखविले आहे. परंतु वैयक्तिक आयुष्य अधिक दाखवायचे की राजकीय जीवन अधिक दाखवायचे यात लेखक-दिग्दर्शकांची काहीशी गल्लत झाली असावी असे चित्रपट पाहताना जाणवते.
ऐतिहासिक चित्रपट करताना असलेली जबाबदारी आणि तो मांडताना पटकथालेखकांवर असलेली जबाबदारी याचे निश्चित भान लेखक-दिग्दर्शकांना आहे आणि त्यांनी हे आव्हान निश्चितपणे चांगल्या प्रकारे पेलले आहे.
प्रसाद ओकने साकारलेला राघोबादादा, अमोल कोल्हेने साकारलेला सदाशिवरावभाऊ प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. रवींद्र मंकणी यांनी नानासाहेब पेशव्यांच्या व्यक्तिरेखेचे पदर आपल्या अभिनयातून लाजवाब साकारले आहेत. अलोक राजवाडेने उत्तम पद्धतीने माधवराव पेशवे साकारले आहेत. सुश्राव्य संगीताचाही चित्रपटाचा अपेक्षित परिणाम साधण्यात मोठा वाटा आहे.
रमा माधव
निर्माते – शिवम जेमिन फिल्म्स
कथा व दिग्दर्शन – मृणाल कुलकर्णी
पटकथा – मनस्विनी लता रवींद्र
संवाद – मनस्विनी लता रवींद्र, दिग्पाल लांजेकर
गीते – सुधीर मोघे, वैभव जोशी
संगीत – आनंद मोडक
छायालेखन – राजीव जैन
संकलन – जयंत जठार
कलावंत – अलोक राजवाडे, पर्ण पेठे, रवींद्र मंकणी, मृणाल कुलकर्णी, श्रुती कार्लेकर, प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, डॉ. अमोल कोल्हे, श्रुती मराठे, सुचित्रा बांदेकर, संतोष सराफ, महेश पाटणकर, योगेश सोमण, अन्वय बेंद्रे, सुनील गोडबोले, ज्ञानेश वाडेकर, आनंद देशपांडे व अन्य.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा