ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट थिएटर्समध्ये पाहिल्यानंतर सोशल मीडियावर यामधील डायलॉग व व्हीएफएक्सची चांगलीच चर्चा होत आहे. काहींना रावणाचे रूप आवडले नाही तर काहींना हनुमानजींची भाषा टपोरीसारखी वाटली. अनेकजणांनी चित्रपटात रामायणातील दृश्ये चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप केला आहे.
‘आदिपुरुष’वर बऱ्याच कलाकारांनीही त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. महाभारत मालिकेत भीष्म पितामह यांची भूमिका साकारणारे मुकेश खन्नापासून रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मधील प्रभू श्रीराम यांची भूमिका अजरामर करणारे अरुण गोविल यांच्यापर्यंत कित्येकांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला. रामानंद सागर यांचं ‘रामायण’ नेमकं लोकांवर कसा प्रभाव टाकायचं याचं एक उदाहरण नुकतंच अरुण गोविल यांनी एका मुलाखतीमध्ये दिलं आहे.
‘रामायण’ चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा अरुण गोविल यांनी झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला. ते म्हणाले, “एकेदिवशी चित्रीकरणादरम्यान मी प्रभू श्रीराम यांचा मेकअप आणि हेयर स्टाईल करून सेटवर बसलो होतो. माझं चित्रीकरण नसल्याने फक्त मी टी-शर्ट आणि शॉर्ट्स परिधान केले होते. अशातच एक महिला सेटवर आली अन् तिने प्रभू श्रीराम यांना भेटण्याची विनंती केली, त्यांनी तिला माझ्याकडे पाठवलं, ती महिला थोडी चिंतेत होती, तिच्या कडेवर एक लहान मूल होतं. ती जशी माझ्याजवळ आली तिने तिच्या कडेवरील मूल माझ्या पायापाशी ठेवलं अन् म्हणाली की हे मुल मरणाच्या दारात आहे त्याला तुम्हीच वाचवू शकता. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी त्यांना म्हणालो की त्या मुलाला रुग्णालयात घेऊन जा अन् त्यावर उपचार करा. मीदेखील त्यावेळी त्या मुलासाठी प्रार्थना केली.”
पुढे अरुण गोविल म्हणाले, “ती दिवसांनी ती महिला पुन्हा सेटवर आली, तेव्हा तो लहान मुलगाही तिच्याबरोबर होता, तो अगदी ठणठणीत झाला होता. खरंतर यात माझं काहीच योगदान नाही. त्या महिलेचा प्रभू श्रीराम यांच्यावर असलेला विश्वास अन् त्यांची भक्ति यामुळेच तो मुलगा वाचला. जेव्हा कुणी असा एखादा धार्मिक चित्रपट काढतो तेव्हा त्यांच्या मनातही असाच विश्वास आणि भक्तिभाव आवश्यक असतो.” एकप्रकारे हा किस्सा सांगून अरुण गोविल यांनी आदिपुरुषच्या निर्मात्यांवर मार्मिक टिप्पणी केली आहे.