२२ जानेवारी हा दिवस देशाच्या इतिहासातला एक आगळावेगळा दिवस ठरणार आहे यात काहीही शंका नाही. याच दिवशी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा होणार आहे. या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना, राजकारण्यांना निमंत्रणं देण्यात आली आहेत. रामायण या १९९० च्या दशकात गाजलेल्या मालिकेत राम, लक्ष्मण आणि सीता या भूमिका करणाऱ्या अरुण गोविल, सुनील लहरी आणि दीपिका चिखलिया यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. आज जेव्हा हे कलाकार अयोध्येत पोहचले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामायण या मालिकेने सगळ्यांनाच भुरळ घातली होती. करोना काळात जेव्हा लॉकडाऊन होतं आणि लोक आपल्या घरी होते तेव्हा दूरदर्शनवर या मालिकेचं पुनःप्रसारणही करण्यात आलं होतं. राम, लक्ष्मण आणि सीता ही पात्रं साकारणारे हे तीन कलाकार लोकांच्या मनात घर करुन राहिले आहेत. त्यांचा अयोध्येतला व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हे पण वाचा- “सीता मातेने शाप मागे घेतला त्यामुळेच…”, अयोध्येचे राजे बिमलेंद्र मिश्रांचं वक्तव्य चर्चेत

रामायण मालिकेत दीपिका, अरुण गोविल आणि सुनील लहरी यांच्या मुख्य भूमिका

रामायण या रामानंद सागर दिग्दर्शित मालिकेत सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका यांनी लाल रंगाची साडी नेसल्याचं दिसतं आहे. तर अरुण गोविल आणि सुनील लहरी म्हणजेच राम आणि लक्ष्मण हे दोघेजण पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा अशा वेशात या व्हिडीओत दिसत आहेत. या तिघांभोवती बरीच गर्दी झाल्याचं या व्हायरल व्हिडीओत पाहण्यास मिळतं आहे. तसंच या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

काही दिवसांपूर्वी सुनील लहरी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नसल्याने आपण नाराज झालो आहोत असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र अयोध्येत राम, लक्ष्मण आणि सीता अशा तिन्ही भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना पाहून लोकांना एकच आनंद झाला. रामायण या मालिकेची लोकप्रियता आत्ताही कायम आहे हेच या स्वागताने दाखवून दिलं. अयोध्येत राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची जंगी तयारी सुरु आहे. या कार्यक्रमासाठी पाच हजारांहून अधिक लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramayana serial star cast arun govil deepika chikhalia and sunil lahri reached ayodhya video viral scj