दिग्दर्शक अनुराग बासूचा ‘लूडो’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूरला बोलक्या बाहुल्यांची कला अवगत असते. यामध्ये हुबेहुब आदित्यसारखा दिसणारा बाहुला सुप्रसिध्द रामदास पाध्ये आणि त्यांचा मुलगा सत्यजीत पाध्ये यांनी बनवली आहे. थ्रीडी प्रिंटिंग प्रणालीचा उपयोग करून त्यांनी आदित्यसारखा दिसणारा बाहुला बनवला आहे.
याविषयी रामदास पाध्ये म्हणाले, “अनुराग बासू यांना आम्ही हुबेहुब दिसणा-या बाहुल्या बनवू शकतो याविषयीची माहिती होती. ते आमच्याकडे आले तेव्हा आम्ही काही संग्रही असलेल्या बाहुल्या त्यांना दाखवल्या होत्या. तेव्हा त्यातले बारकावे पाहून ते चकित झाले होते.”
बोलक्या बाहुल्यांच्या कलेत ५३ वर्षांचा गाढा अनुभव असलेल्या रामदास पाध्येंच्या संग्रही २२०० पेक्षा जास्त बाहुल्या आहेत. वडिलांप्रमाणेच या क्षेत्रात नाव कमावलेले सत्यजित पाध्ये तर ‘इंडियाज गॉट टॅलेंट’, ‘केबीसी’, ‘बिग बॉस’ अशा लोकप्रिय शोमध्येही दिसले.
सत्यजीत सांगतात, “आदित्यची थ्रीडी बाहुली बनवताना आम्ही त्याचा थ्रीडी स्कॅन केरून घेतला. त्यानंतर आदित्यचे काही थ्रीडी फोटो काढले. आणि मग त्यानुसार फायनल थ्रीडी प्रिंटेड बाहुली तयार केली.”
आदित्यच्या चेहऱ्याची ठेवण, भुवया, आणि पापण्या यांची हालचाल या गोष्टी आव्हानात्मक होत्या. मग इथे रामदास पाध्ये यांचा प्रगाढ अनुभव कामी आला. यानंतर आदित्यला सत्यजीत यांनी ट्रेनिंग दिलं.