मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांनी आज वयाच्या ७० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश भाटकर यांचा रंगभूमी, रुपेरी पडदा आणि छोटा पडदा अशा तिन्ही मंचावर वावर होता. मात्र त्यांचं खरं प्रेम हे रंगभूमीवरच होतं. आजपर्यंत त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं असून त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.
रमेश भाटकर यांना खरी ओळख रंगभूमीमुळे मिळाली. त्यांच्या अनेक नाटकांचं आजही आवर्जुन नाव घेतलं जातं. १९७५ साली रंगमंचावर सादर झालेल्या ‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकामुळे रमेश भाटकर यांची वेगळी ओळख निर्माण झाली. या नाटकात ते मुख्य भूमिकेत झळकले होते.
या नाटकांव्यतिरिक्त अशी बरीच नाटक आहेत ज्यामध्ये त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. ‘मुक्ता’, ‘उघडले स्वर्गाचे दार’, ‘देणाऱ्याचे हात हजार’ या नाटकांमध्ये ते मुख्य भूमिकेत झळकले असून या नाटकांनी त्याकाळी रंगभूमी गाजविली होती. विशेष म्हणजे रमेश भाटकर यांनी ५० हून अधिक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केलं होतं.