प्रकाश राज, राणा डग्गुबती व विजय देवरकोंडा… दक्षिण सिनेसृष्टीतील हे तीन लोकप्रिय कलाकार आहेत. या अभिनेत्यांनी आजवर त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. मात्र, आपल्या अभिनय आणि भूमिकांमुळे चर्चेत असणारे हे तिन्ही कलाकार आता कायदेशीर कचाट्यात अडकले आहेत. तेलंगणा पोलिसांनी २५ कलाकार आणि काही प्रभावी व्यक्तींविरुद्ध बेकायदा बेटिंग अ‍ॅप्सना प्रोत्साहन दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

त्यामध्ये राणा डग्गुबती, विजय देवरकोंडा, प्रकाश राज, मंचू लक्ष्मी व निधी अग्रवाल यांसारख्या कलाकारांची नावे आहेत. त्यांच्यावर बेटिंग अ‍ॅप्सना प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, सायबराबादमधील मियापूर पोलिसांनी ३२ वर्षीय व्यावसायिक फणींद्र शर्मा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. याचिकाकर्त्याचा असा दावा आहे की, त्यांच्या जाहिरातींमुळे तरुण प्रेक्षकांवर परिणाम झाला आणि वापरकर्त्यांमध्ये आर्थिक संकट निर्माण झाले.

फणींद्र शर्मा यांनी या सेलिब्रिटींवर बेटिंग अ‍ॅप्सचा प्रचार करण्याचा आणि जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप केला होता. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर सुरेखा वाणी, सुप्रीता, रितू चौधरी व गेटअप श्रीनु यांच्यासह अनेक तेलुगू टीव्ही कलाकारांनी जाहीरपणे माफी मागितली आहे आणि बेटिंग अ‍ॅप्सना प्रोत्साहन देण्यात त्यांचा सहभाग असल्याचं मान्य केलं आहे. त्याशिवाय या बेटिंग अ‍ॅप्सच्या नकारात्मक परिणामांची माहिती नसल्याचंही कबूल केलं.

विजय देवराकोंडा
विजय देवराकोंडा

तेलंगणा गेमिंग कायद्याच्या कलम ३, ३(अ) व ४ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(ड) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या अ‍ॅप्समध्ये‌ केल्या गेलेल्या आर्थिक गुंतवणुकीचा तपास सुरू केला आहे आणि या कथित प्रकरणात कलाकारांचा सहभाग किती आहे याची ते तपासणी करीत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणी दोषी धरल्या गेलेल्या प्रकाश राज, राणा डग्गुबती व विजय देवरकोंडा या कलाकारांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राणा डग्गुबती
राणा डग्गुबती

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच, पंजगुट्टा पोलिसांनी किरण गौड, विष्णू प्रिया, श्यामला, इम्रान खान, रितू चौधरी, हर्ष साई, टेस्टी तेजा व बंडारू शेषयानी सुप्रीता यांच्यासह ११ चित्रपट कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर्सवर बेटिंग अ‍ॅपचा प्रचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर आता प्रकाश राज, राणा डग्गुबती व विजय देवराकोंडा या कलाकारांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.

Story img Loader