‘बर्फी’ आणि ‘यह जवानी है दिवानी’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर रणबीरच्या विचारांची गाडी बेफाम वेगाने धावू लागली आहे. या वेगात आपल्या पायाखाली काय काय चिरडले जाते आहे, याचे भान त्याला नसले तरी बॉलिवूडमधील प्रस्थापित ‘खानावळ’ हे खपवून घेणारी नाही. सलमानच्या ‘दबंग’सारखा हिट चित्रपट आपणही करू शकतो म्हणून रणबीरने त्याच्या ‘दबंग’ दिग्दर्शकाला, अभिनव कश्यपला हाताशी घेत ‘बेशरम’चा घाट घातला. या चित्रपटामुळे अभिनवने सलमानला ‘दबंग २’साठी डच्चू दिला, हा राग सलमानच्या मनात होताच. त्यात ‘बेशरम’मध्ये रणबीरने सलमानची टरही उडवून घेतली. गंमतीगंमतीतल्या या प्रकाराला सलमाननेही नुकतेच तोडीस तोड उत्तर दिले आहे. एवढे भागत नाही तोवर रणबीरने शाहरूखलाही टार्गेट केले आहे. शाहरूखचा ‘हॅप्पी न्यू इअर’ पुढच्या वर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार आहे आता त्याच तारखेला आपला ‘जग्गा जासूस’ प्रदर्शित होणार असल्याचे रणबीरने जाहीर केले आहे. आधी आपली कोरकीर्द घडवायची सोडून ‘आरके ज्युनिअर’ उगीचच दोन दशके इंडस्ट्रीवर वर्चस्व राखणाऱ्या ‘खानावळी’च्या शेपटावर पाय ठेवू पाहत आहे.
रणबीरच्या या कुरापतींचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला लवकरात लवकर खानावळींची नंबर वन जागा पटकवायची आहे. अर्थात, त्याचा हेतू सलमानपासून लपलेला नाही. आणि म्हणूनच शाहरूखशी दिलजमाईची जाहीर कबुली दिल्यानंतर सलमानने आपल्या चित्रपटांसाठी थेट रणबीरशीही स्पर्धा असल्याचे बोलून दाखवले होते. आता, रणबीरच्या ‘बेशरम’ कुरापतीनंतर तर सलमाननेही ‘बिग बॉस’च्या सेटवर बेशरमगिरीतही आपण त्याच्यापेक्षा वरचढ असल्याचे दाखवून दिले आहे. ‘बिग बॉस’च्या  सेटवर ‘वॉर छोड ना यार’ चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी आलेल्या शर्मन जोशी आणि जावेद जाफरी यांनी आपल्या चित्रपटाला किती यश मिळेल, याची चर्चा सुरू केली. शर्मनने ‘थ्री इडियट्स’लाही समीक्षकांनी तीनच स्टार दिले होते पण, चित्रपट मात्र नंतर धो धो चालला याची आठवण करून दिली. ही संधी मिळताच सलमानने रणबीरच्या ‘बेशरम’लाही समीक्षकांनी दीड स्टार दिले होते पण, चित्रपटाचे एकूण कलेक्शन पाहून त्यांनी तो अर्धा स्टारही काढून घेतला, अशा शब्दांत रणबीरच्या कुरापतींचा समाचार घेतला. आता रणबीरने शाहरूखलाही डिचवले आहे. आता या यादीत उरलाय आमिर खान?

Story img Loader