‘राझी’ या चित्रपटानंतर चाहत्यांच्या मनावर राज्य गाजविणारी अभिनेत्री आलिया भट्ट सध्या ‘कलंक’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या दोन चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. या दोन्ही चित्रपटामध्ये आलिया प्रमुख भूमिकेत झळकणार असून ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर आलिया जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे आलिया जखमी झाल्यानंतर अभिनेता रणबीर कपूर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना दिसून आला.
आलिया लवकरच अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये झळकणार असून सध्या या चित्रपटाचं चित्रीकरणामध्ये ती व्यस्त आहे. दरम्यान, चित्रीकरण सुरू असताना आलियाच्या पायाला किरकोळ दुखापत झाल्यामुळे रणबीर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली ही जोडी अत्यंत साध्या वेशात होती. यावेळी आलियाच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता.आलिया ‘ब्रह्मास्त्र’सोबतच अभिषेक वर्मनचा मल्टिस्टार चित्रपट ‘कलंक’ मध्येदेखील झळकणार आहे. त्यामुळे सध्या सततच्या कामामुळे तिच्यावर ताण येत असल्याचं पाहायला मिळत आहे.