बॉलिवूडमधील बहुचर्चित बिग बजेट ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट ९ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटालादेखील बॉयकॉट ट्रेण्डचा सामना करावा लागला. मात्र या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ३७ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ४२ कोटींची कमाई करत चित्रपटाने देशभरात १०० कोटींचा आकडा पार केला.
या चित्रपटाने आतापर्यंत भारतात १२५ कोटींची तर जगभरात २१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचं सगळेच जण कौतुक करत असताना कंगना रणौतने मात्र नव्या वादाला सुरुवात केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईचा आकडा पाहून कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईचे आकडे खोटे असल्याचे तिने म्हटलं आहे.
कंगना म्हणाली, “शुक्रवारी (९ सप्टेंबर) ‘ब्रम्हास्त्र’ प्रदर्शित झाला आणि लगेचच रविवारी हा चित्रपट सुपरहिट ठरला. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने भरघोस कमाई देखील केली. म्हणजेच २५० कोटी. (हा कमाईचा आकडा खोटा आहे.) वीएफएक्ससह हा चित्रपट करण्यासाठी ६५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. गणिततज्ञ करण जोहरचं गणित आम्हालाही शिकायचं आहे.”
कंगना इथवरच थांबली नाही. ती पुढे म्हणाली, “बॉक्स ऑफिस इंडिया यांसारखे अधिकृत सोशल मीडिया पेज चालवणाऱ्यांनी मला तसेच माझ्यासारख्या अनेक लोकांना त्रास दिला आहे. माफियांच्या पगारावर ते काम करतात. एका दिवसामध्येच ‘ब्रम्हास्त्र’ सुपरहिट असल्याचं त्यांनी घोषित केलं.” बॉयकॉट ट्रेण्डनंतर कंगनाच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटणार का? हे पाहावं लागेल.