बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणून रणबीर कपूर आणि आलिया भट्टला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र त्यांच्या लग्नाच्या तारखेबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे. पण नुकतंच त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी याबाबतची माहिती दिली.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. काल आलिया आणि रणबीरचा मेहंदी सभारंभ पार पडला. या मेहंदीच्या कार्यक्रमानंतर रणबीर कपूरची आई नीतू कपूर आणि बहिण रिद्धीमा कपूर यांनी पापराझींसमोर आले. त्यावेळी अनेक फोटोग्राफर्सने त्यांना आलिया-रणबीरच्या लग्नाची तारीख नेमकी काय आहे? असा प्रश्न विचारला. त्यासोबतच नक्की त्यांचे लग्न कधी कुठे होणार आहे याबद्दलही विचारले.
यावर उत्तर देताना रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी ‘उद्या’ असे म्हटले. त्यावर अनेकांना त्या मस्करी करतात असे वाटले. म्हणून अनेकांनी त्यांना पुन्हा एकदा लग्न कधी आहे अशी विचारणा केली. त्यावर त्या म्हणाल्या, “अरे लग्न उद्या आहे.” त्यांचे हे उत्तर ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. नीत कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आज (१४ एप्रिल) रोजी लग्न करणार आहेत.
यानंतर नीतू कपूर यांना नवी होणारी सूनबाई म्हणजेच आलिया कशी आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या, ‘मी तिच्याबद्दल काय बोलू. ती सर्वोत्तम आहे.’ यानंतर आलियाची होणारी नणंद रिद्धीमा म्हणाली, “ती फारच क्यूट आहे.”
दरम्यान आलिया आणि रणबीरचा हळदी आणि मेहंदी समारंभ ‘वास्तू’मध्येच पूर्ण विधींसह पार पडला आहे. यावेळी संपूर्ण कपूर आणि भट्ट कुटुंबाने हजेरी लावली होती. यासोबत आलिया आणि रणबीरच्या जवळच्या मित्रांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी करण जोहर, श्वेता बच्चन यांनी यावेळी हजेरी लावली होती. रणबीरच्या लग्नाची वरात कृष्णराज बंगल्यातून निघणार आहे. त्यानंतर वांद्र्यातील वास्तू या ठिकाणी ते दोघेही सप्तपदी घेतील.