रणबीर ‘संजय दत्त’च्या आणि अमिताभ ‘सुनील दत्त’च्या भूमिकेत
वेगवेगळय़ा प्रकारच्या भूमिका करायला मिळणे, ही कोणत्याही कलाकारासाठी चांगली संधी असते. हे काम करताना त्यांना चित्रपटासाठी का होईना पण आपल्या प्रत्यक्ष जीवनातील भूमिकांचीही अदलाबदल करावी लागते. अशीच भूमिकांची अदलाबदल बॉलीवूडमध्ये लवकरच एका चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन आणि अभिनेता रणबीर कपूर हे वडील-मुलगा म्हणून पाहायला मिळणार आहेत, तेही चक्क ‘सुनील दत्त’ आणि ‘संजय दत्त’ यांच्या भूमिकेत. अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर तयार होणाऱ्या आगामी चित्रपटात हा योग जुळून येणार आहे.
निर्माता-दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि संजय दत्त हे चांगले मित्र असून हिरानी आपला मित्र संजय दत्त याच्या जीवनावर एका चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. याच आगामी चित्रपटात रणबीर कपूर ‘संजय दत्त’च्या आणि अमिताभ बच्चन ‘सुनील दत्त’च्या भूमिकेत दिसणार आहेत. हिरानी यांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे संजय दत्त याच्या चाहत्यांबरोबरच अमिताभ आणि रणबीरच्या चाहत्यांना तसेच प्रेक्षकांनाही हे दोघेही ‘दत्त’पिता-पुत्र म्हणून कसे दिसतात, ते पाहण्याची उत्सुकता आहे. ‘रॉकी’हा संजय दत्त याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात संजय दत्त तेव्हा जसा दिसायचा तसा आत्ताचा रणबीर दिसतो, असे हिरानी यांना वाटते. संजय दत्त आणि बच्चन कुटुंबीयांचे चांगले संबंध असून त्याचा फायदा या चित्रपटासाठी हिरानी करून घेणार आहेत. त्यामुळेच ‘सुनील दत्त’यांची भूमिका करण्यासाठी बच्चन यांना विचारणा करण्यात आली आहे. संजय दत्तवरील या आगामी चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी बॉलीवूडमध्ये संजय दत्तवर निर्माण होत असलेल्या या चित्रपटाची तसेच अमिताभ व रणबीर यांच्या भूमिकांची चर्चा सुरू आहे.

Story img Loader