आपल्या वैयक्तिक आयुष्यात होणारी प्रसिद्धीमाध्यमांची ढवळाढवळ रणबीर कपूरला नेहमीच अस्वस्थ करते. त्यामुळे पहिल्यापासूनच केवळ चित्रपटांच्या प्रसिद्धी कोर्यक्रमांपुरता रणबीर माध्यमांसमोर येतो. एरव्ही तो माध्यमांपासून कोसो दूर असतो. तरीही एका जाहीर कार्यक्रमात पुन्हा एकदा कतरिनावरूनच प्रश्नांचा भडिमार झाल्यानंतर रणबीरने तिथून बाहेर जाणे पसंत केले. कतरिनाबद्दल जाहीरपणे काहीही बोलणार नाही, अशी तंबीच रणबीरने आपल्या कृतीतून दिली आहे.
कतरिना आणि रणबीरच्या इबिझा प्रकरणानंतरही तो काही बोलला नव्हता, की त्याने कुठल्याही प्रकारचा खुलासा दिला नव्हता. उलट, त्यावेळी ‘धूम ३’च्या प्रसिद्धीसाठी म्हणून माध्यमांसमोर आलेल्या कतरिनाला सगळ्यांच्याच उलटसुलट प्रश्नांना उत्तरे द्यावी लागली होती. त्यानंतर या जोडीने खुल्लमखुल्ला आपले प्रेम प्रकरण पुढे नेत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नवीन घरही घेतले. रणबीर आणि कतरिनाच्या प्रत्येक गोष्टीबद्दल कायम चर्चा होत राहिली आहे. त्यांचे नवीन वर्ष साजरे करणे असेल, त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला की नाही यावरचा खल असेल, नाही तर कतरिना सून म्हणून नीतू सिंग यांना कशी पसंत नाही, याबद्दल चर्चा असेल. यापैकी कुठल्याही गोष्टीला रणबीरने आजपर्यंत उत्तर दिलेले नाही. कतरिनाने तर त्यानंतर स्वत:ला कोषात ओढून घेतले आहे. प्रसिद्धीमाध्यमांपासून स्वत:ला दूर ठेवत आपले कार्यक्रम पार पाडण्याचा ती कसोशीने प्रयत्न करत असते. रणबीर तेही करत नाही.
रणबीर कपूर माध्यमांशी बोलतही नाही. मात्र, कुठलीही गोष्ट लपूनही करत नाही. त्यामुळे तो समोर आल्यानंतर जाहीरपणे त्याच्याकडून कबुली घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या माध्यमांच्या पदरी आजवर तरी निराशाच आलेली आहे. नुकत्याच झालेल्या निर्माता रॉनी स्क्रुवाला यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात रणबीर कपूर प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. या कार्यक्रमात रणबीरला कतरिनावरून अनेक प्रश्न विचारण्यात आले. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे नाही, असे सूचित करूनही कतरिनावरचे प्रश्न थांबायचे नाव घेईनात. तेव्हा कंटाळून रणबीर कार्यक्रमातून उठला. त्याने उपस्थितांचे धन्यवाद मानत तेथून काढता पाय घेतला. कतरिनाबरोबरचे त्याचे आयुष्य ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही. त्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या पाटर्य़ा, सहकलाकारांच्या गाठीभेटी याबद्दल त्यांनी काही लपवलेले नाही. मात्र त्यांच्या नातेसंबंधांवरून विचारल्या जाणाऱ्या त्याच त्याच प्रश्नांचा रणबीरला कंटाळा आला आहे. आणि म्हणूनच कधी नव्हे ते कार्यक्र मातून बाहेर पडत त्याने माध्यमांना कतरिनाविषयी काहीही बोलणार नाही, अशी तंबी दिली आहे.