रणबीर कपूर, वाणी कपूर, संजय दत्त यांचा नुकताच आलेला ‘शमशेरा’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलाच आपटला. चित्रपटाचं जेवढं बजेट होतं तेवढी कमाईदेखील याने केली नसल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. शिवाय हा चित्रपट कॉपीराइटच्या वादात अडकल्याने चित्रपट प्रदर्शनानंतर यश राज फिल्म्स यांना १ कोटी रुपये इतका दंडदेखील भरावा लागला होता. त्यानंतरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला गेला. ओटीटीवर देखील या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारलं आहे. आता हाच चित्रपट लोकांनी ओटीटीवर का बघावा यासाठी Amazon prime आणि या चित्रपटातले कलाकार यांनी एक शक्कल लढवली आहे.

नुकताच Amazon prime च्या अधिकृत युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला गेला. या व्हिडिओचं नाव आहे “शमशेरा बघण्याची ५ कारणं.” व्हिडिओमध्ये रणबीर आणि वाणी ही कारणं सांगताना आपल्याला दिसतात. ही एक मार्केटिंग स्ट्रॅटजी आहे. जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट बघावा यासाठी निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म यांचा खटाटोप सुरू आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नेटकऱ्यांनी शोधली रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटातील मोठी चूक, तुम्ही पाहिली का?

या व्हिडिओमध्ये रणबीर आणि वाणी म्हणतात की “खरंतर हा चित्रपट बघायची १०० कारणं आहेत, पण चला आम्ही तुम्हाला ५ कारणं सांगतो.” त्यातलं पहिलं कारण ते दोघे असं देतात की, या चित्रपटात तुम्हाला सगळ्या प्रकारच्या भावना अनुभवायला मिळतील. चित्रपट पाहताना तुम्ही हसाल, रडाल, दुखी व्हाल, घाबराल, आणि यामुळे तुमच्या चेहेऱ्यावरील स्नायूंचा व्यायाम होईल. दुसरं कारण ते देतात की, चित्रपट बघताना तुम्ही बाहेरून जेवण मागवणार. तेव्हा जेवढी लोकं बाहेरून जेवण मागवतील तेवढाच हॉटेल्सना फायदा होईल, त्यांचा धंदा वाढेल आणि यामुळेच देशाचा जीडीपी वाढेल.

तिसरं कारण ते देतात म्हणजे फिरण्याचं. ‘शमशेरा’ हा वेगवेगळ्या ठिकाणी चित्रित झाला आहे. त्यामुळे चित्रपट बघताना तुम्ही त्या सुंदर ठिकाणांच्या मोहात नक्की पडाल आणि ते ठिकाण नक्की कुठे आहे ते शोधून मित्रांसोबत त्या ठिकाणी फिरायला जायचं ठरवाल. पुढील कारण म्हणजे या चित्रपटातील वेशभूषा आणि दाग दागिने प्रेक्षकांना भुरळ पाडतील आणि प्रेक्षक त्याच डिझाईनचे कपडे आणि दागिने वापरायचा आग्रह धरतील. रणबीर आणि वाणी शेवटचं कारण सांगतात की, सगळे घरी बसून प्राइम व्हिडिओवर ‘शमशेरा’ बघतील तेव्हा बाहेर रस्त्यावर कसलीच गर्दी नसेल, कुणीच कुणाशी भांडणार नाही. त्यामुळे ‘जागतिक शांती’चा संदेश हा चित्रपट देतो. असं या दोन्ही स्टार्सचं म्हणणं आहे.

रणबीर आणि वाणी यांचा हा व्हिडिओ चांगलाच गाजतोय. या व्हिडिओमुळे सध्या त्यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे. लोकं शमशेरा बघू नये याची १०० कारणंसुद्धा त्या व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये देत आहेत. एकूणच ‘शमशेरा’ हा चित्रपट चांगलाच आपटला असून तो ओटीटीवर तरी लोकांनी बघावा यासाठी निर्माते, कलाकार यांना या अशा युक्त्या शोधून काढाव्या लागत आहेत.