सोशल मीडियावर चालणाऱ्या बॉयकॉट ट्रेंडमुळे ओटीटी प्लॅटफॉर्मची चांगलीच चांदी झाली आहे. चित्रपट थिएटरमध्ये जरी फ्लॉप झाला तरी ओटीटीच्या माध्यमातून त्याची योग्य ती किंमत निर्मात्यांना वसूल करता येते. लॉकडाऊनच्या काळापासूनच ओटीटीचा वापर हा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. मध्यंतरी बरेच चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित झाल्याने वितरक, प्रदर्शक आणि निर्माते यांच्यात वादही झाला होता. आता थिएटर्स सुरू झाली असली तरी खासकरून बॉलिवूडचे बरेचसे चित्रपट एकापाठोपाठ एक बॉक्स ऑफिसवर आदळताना दिसत आहेत. काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूर, संजय दत्त आणि वाणी कपुर यांच्या ‘शमशेरा’ची अशीच अवस्था झाली होती.
यश राजसारख्या एवढ्या मोठ्या बॅनरखाली बनलेला चित्रपट इतका फ्लॉप होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. आजच म्हणजे १९ ऑगस्ट रोजी रणबीरचा ‘शमशेरा’ अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. मध्यंतरी चित्रपटगृहांच्या मालकांचे नुकसान होऊ नये म्हणून चित्रपटांच्या ओटीटी रिलीज संदर्भात एक नियम लागू करण्यात आला होता. चित्रपट सिनेगृहात प्रदर्शित झाल्यापासून तब्बल ५२ दिवसांनी तो ओटीटीवर प्रदर्शित करावा असा नियम करण्यात आला होता. ‘शमशेरा’ मात्र एका महिन्याच्या आतच ओटीटीवर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक पुन्हा बॉलिवूड चित्रपटांना हिणवू लागले आहेत.
रणबीरचा ‘शमशेरा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत करण मल्होत्रा. त्यांनी याआधी करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनसाठी ‘अग्निपथ’चं दिग्दर्शन केलं होतं. अग्निपथ चांगला चालला असल्या कारणाने करण यांच्या या चित्रपटाकडून लोकांच्या अपेक्षा होत्या. लोकांनी मात्र ‘शमशेरा’ला साफ नकारलं आहे. चित्रपटातल्या संजय दत्तच्या हिंदू पात्रामुळे देखील सोशल मीडियावर या चित्रपटाची चांगलीच आलोचना झाली आहे. दिग्दर्शक करण मल्होत्रा आणि अभिनेता संजय दत्त यांनी काही दिवसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला होता. लोकांनी मात्र दोघांच्याही वक्तव्याकडे दुर्लक्ष केलं आहे.
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म आणि चित्रपटगृहांचे मालक यांच्यातला वाद तात्पुरता थांबला असला तरी प्रदर्शक आणि वितरक हे नाराज आहे. बॉलिवूडकडून येणारे प्रत्येक चित्रपट फ्लॉप होत असल्या करणारने याचा फटका चित्रपटगृहांच्या मालकांना बसत आहे. “चित्रपट जर लगेच ओटीटीवर यायला लागले तर मग आम्ही आमचा व्यवसाय कसा करायचा?” असा सवाल चित्रपट प्रदर्शक आणि सिनेमागृहांचे मालक विचारत आहेत.
आणखीन वाचा : रणबीर कपूरची जादू फिकी, अवाढव्य खर्च, जबरदस्त प्रमोशन करूनही ‘शमशेरा’ला थंड प्रतिसाद