बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चांना मागच्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. चाहत्यांना दोघांच्या लग्नाबाबत कमालीची उत्सुकता आहे. रणबीर आणि आलिया यांनी याबाबत अद्याप मौन बाळगलं असलं तरीही या दोघांच्या लग्नाबाबत आता काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रणबीरने त्याच्या राहत्या बिल्डिंगमध्ये लग्नाचा हॉल बूक केल्याची माहिती समोर आली आहे.
‘बॉम्बे टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, रणबीरने तो राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये हा हॉल ७ ते ८ दिवसांसाठी बूक केला आहे. तिथेच लग्नाचे सगळे कार्यक्रम होणार आहेत. या हॉलमध्ये केवळ ४० ते ५० लोक उपस्थित राहू शकतात. तर एका दिवशी १५ पेक्षा जास्त लोक तिथे उपस्थित राहणार नाही, असे आश्वासन रणबीरने त्याच्या बिल्डिंगच्या समितीला दिले आहे. याशिवाय रणबीरची बॅचलर पार्टी, लग्नाच्या आधी असलेले काही कार्यक्रम आणि त्यानंतरचे काही छोटे कार्यक्रम इथेच होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्डिंगच्या समितीने रणबीरला हॉलमध्ये आवाजाची पातळी कमी ठेवण्यास सांगितले असून स्वच्छता ठेवण्यास सांगितले आहे.
रणबीर आणि आलिया मुंबईतील कोणत्याही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही तर कपूर कुटुंबीयांच्या प्रसिद्ध ‘आरके हाऊस’मध्ये सप्तपदी घेणार आहेत. लग्नाचं ठिकाण हे रणबीरनं स्वतः ठरवलं आहे. रणबीर आणि त्याची आजी कृष्णा राज कपूर यांचं खूप चांगलं बॉन्डिंग होतं. त्याचे आई- वडील ऋषी कपूर आणि आई नीतू कपूर यांचं लग्नही याच आरके हाऊसमध्ये झालं होतं. त्यामुळे हे घर रणबीरसाठी खूप खास आहे आणि म्हणूनच त्यानं आरके हाऊसमध्ये आलियाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. रणबीर आणि आलिया आरके हाऊसमध्ये १५ किंवा १६ एप्रिल रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. तर १४ एप्रिल पासून लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा : ३० वर्षांनंतर शनि करणार आवडत्या राशीत प्रवेश, या ४ राशींवर लक्ष्मी देवी करणार धनवर्षाव
दरम्यान, रणबीर आणि आलिया यांच्या लग्नात त्यांचे काही जवळचे मित्र आणि कुटुंबातील काही सदस्य हजेरी लावणार आहेत. रणबीरची इच्छा आहे की त्याने अनेक वर्षे काम केलेल्या टेक्निशियने देखील त्याच्या लग्नात हजेरी लावावी. त्याच्या लग्नात बेस्ट फ्रेंड अयान मुखर्जी, करण जोहर, आदित्य रॉय कपूर हे उपस्थित असणार आहेत.