बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचा अखेरचा चित्रपट ‘शर्माजी नमकीन’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर तब्बल दोन वर्षांनी निर्मात्यांनी हा चित्रपट पूर्ण केला आहे. उद्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने नुकतंच त्यांचा मुलगा अभिनेता रणबीर कपूर याने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. रणबीर कपूरचा हा व्हिडीओ अभिनेता फरहान अख्तरने शेअर केला आहे. या व्हिडीओ रणबीर कपूर हा वडिलांच्या आठवणी ताज्या करताना दिसत आहे. तसेच हा चित्रपट त्याच्या हृदयाच्या अगदी जवळ असल्याचेही त्याने सांगितले आहे.
फरहान अख्तरने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात रणबीर कपूर हा ‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटासह ऋषी कपूर यांच्याबद्दल बोलताना दिसत आहे. यावेळी रणबीर म्हणाला, “मी आज तुमच्यासोबत काहीतरी खास शेअर करणार आहे. ‘शर्माजी नमकीन’ हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. हा चित्रपट विशेष यासाठी नाही की हा माझ्या वडिलांचा शेवटचा चित्रपट आहे. तर या चित्रपटाच्या कथेवर माझ्या वडिलांचा फार जास्त विश्वास होता म्हणून तो खास आहे. जेव्हा या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान माझे वडील आजारी पडले तेव्हाही हा चित्रपट पूर्ण करावा, अशी त्यांची इच्छा होती. मात्र त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं.”
“पण माझे वडील नेहमी म्हणायचे की शो मस्ट गो ऑन अँड ऑन. मी त्यांना अशाचप्रकारे जगताना पाहिले आहे. त्यांच्या निधनानंतर हा चित्रपट पूर्ण होणार नाही असे क्षणभर वाटले. हा चित्रपट VFX आणि इतर काही तंत्रांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा विचार आम्ही केला. मी स्वतः असा प्रोस्थेटिक लूक घालून पूर्ण करतो, असेही आमचे ठरलं होतं. पण ते शक्य नव्हते. आमच्यासाठी हा खूप कठीण काळ होता. मग परेश रावल यांनी हे पात्र साकारत ही अडचण दूर केली. परेश रावल यांचे खूप खूप आभार, ज्यांच्यामुळे हा चित्रपट पूर्ण झाला. दोन भिन्न व्यक्तींनी एकच पात्र साकारत आहे, असे फार क्वचित या जगात पाहायला मिळते. माझ्या वडिलांसोबतची सर्वात खास आठवणींपैकी ही माझी एक आठवण आहे. उद्या ‘शर्माजी नमकीन’ चा ट्रेलर येत आहे, नक्की बघा”, असेही रणबीर कपूर म्हणाला.
सलमान खान करणार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण, फोटो शेअर करत चिरंजीवी म्हणाले…
‘शर्माजी नमकीन’ हा ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट आहे. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या भूमिकेचं चित्रीकरणदेखील अर्ध्यावर राहिलं होतं. त्यानंतर त्यांच्या जागी परेश रावल ही भूमिका साकारणार आहेत. त्यांनी हा चित्रपट पूर्ण केला आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा नवा ट्रेलर येत्या १७ मार्चला होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. तर येत्या ३१ मार्च रोजी प्रेक्षकांना घरबसल्या अॅमेझॉन प्राईमवर हा चित्रपट पाहता येणार आहे.
दरम्यान, रितेश सिधवानी व फरहान अख्तर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर हितेश भाटिया या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटातून एका ६० वर्षीय व्यक्तीची कथा सांगितली जाणार आहे.