अनुराग कश्यपचा महत्त्वाकांशी आणि बहुचर्चित सिनेमा ‘बॉम्बे वेल्व्हेट’ मागच्या आठवडय़ात प्रदर्शित झाला, पण प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपटाच्या अपयशाचा परिणाम आता रणबीर कपूरलाही जाणवू लागला असून त्यालाही आपल्या कारकीर्दीबाबत धास्ती वाटू लागली आहे.
रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, करण जोहर अशी तगडी कलाकारांची साथ आणि अनुराग कश्यपचे दिग्दर्शन असलेल्या ‘बॉम्बे वेल्व्हेट’ चित्रपटाकडे बॉलीवूडचेच नाही तर प्रेक्षकांचेही लक्ष लागले होते. स्वत: अनुरागला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. पण चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याची लांबी, त्यातील आक्षेपार्ह शब्द यांच्यामुळे चित्रपटाभोवती नकारात्मकतेचे वारे घोंगावू लागले होते. १०० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने आठवडय़ाभरात अवघ्या २०.९७ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे ही संधी साधत गेले काही दिवस या चित्रपटाच्या अपयशाच्या निमित्ताने बॉलीवूडमधील कित्येकांनी अनुरागवर टीकाही केली. ऋषी कपूरनेही या चित्रपटाच्या अपयशाबद्दल अनुरागला दोषी मानलं असून त्यावर ट्विटरवरून त्याच्यावर टीका केली होती. पण या सर्व प्रकरणामध्ये चित्रपटाचा नायक रणबीरने मात्र मौन राखणे पसंत केले होते. ‘बेशरम’, ‘रॉय’ या चित्रपटांच्या अपयशानंतर रणबीरला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. त्यामुळे चित्रपटाचे अपयश त्याला जिव्हारी लागले आहे. नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रणबीरने आपल्या कारकीर्दीबद्दल जाणवणारी चिंता व्यक्त केली. त्याच्या म्हणण्यानुसार सध्या त्याला त्याच्या कारकीर्दीविषयी असुरक्षितता वाटू लागली आहे. त्यामुळे आपली अवस्था गोंधळलेली असल्याचे त्याने सांगितले. सध्या तो इम्तियाज अलीचा ‘तमाशा’ आणि अनुराग बासूचा ‘जग्गा जासूस’ या दोन चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये गुंतला आहे. हे दोन्ही चित्रपट बिग बजेट आहेत. त्यामुळे त्याच्या अपेक्षा या चित्रपटांवर लागल्या आहेत.

Story img Loader