सणासुदीमध्ये स्टार मंडळींनी चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा हिंदी चित्रपटसृष्टीत आहे. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत रणबीर कपूर  ‘बॉम्बे वेल्वेट’ हा त्याचा आगामी चित्रपट पुढच्या वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित करतो आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतले आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान या सुपरस्टारसनी दिवाळी, ईद किंवा ख्रिसमससारख्या सणासुदीला आपले चित्रपट प्रदर्शित केले होते.
‘बॉम्बे वेल्वेट’चा सहनिर्माता वाकास बल म्हणाला, हा चित्रपट सणाच्या दिवसांमध्ये प्रदर्शित करण्यास योग्य असून, जुलैच्या मध्यात चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होईल. २०१४ च्या ख्रिसमसला चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले असल्याचे देखील त्याने सांगितले.
सणांच्या मोसमाचा फायदा घेत चित्रपट प्रदर्शित करणारा आमिर खान त्याचा ‘धुम-३’ हा चित्रपट ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित करीत असून, या आधी  सणांच्या दिवसांमध्ये प्रदर्शित केलेले ‘तारे जमीन पर’, ‘गजनी’ आणि ‘३ इडियट्स’ सारखे त्याचे चित्रपट ब्लॉकबस्टर झाले आहेत. मागच्या वर्षी सलमान खानचा ‘दबंग-२’ आणि २०११ मध्ये शाहरूख खानचा ‘डॉन-२’ हे चित्रपट देखिल सणांच्या दिवसातच प्रदर्शित झाले होते.
अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बॉम्बे वेल्वेट’ हा चित्रपट इतिहासाचार्य ग्यान प्रकाश यांच्या ‘मुंबई फेबल्स’ या पुस्तकावर अधारित आहे. चित्रपटात १९६० चा काळ दाखविण्यात आला असून, श्रीलंकेमध्ये १९६० चा काळातील मुंबई दाखविणारा सेट उभारण्यात आला आहे. चित्रपटात रणबीर आणि अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत असून करण जोहर नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader