महानायक अमिताभ बच्चन यांनी अभिनेता रणबीर कपूर हा आपल्यापेक्षा लोकप्रिय असल्याचे म्हटले आहे. त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली आहे. एखादी छोटीशी भूमिका देखील ते रणबीरबरोबर करायला तयार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या ‘भूतनाथ रिटर्न्स’ चित्रपटात रणबीर कपूर पाहुण्या कलाकाराची भूमिका करताना दिसणार आहे. रणबीरची भूमिका असलेल्या दृष्याचे चित्रीकरण करण्यात आले असून, रणबीर यात अभिनेता रणबीर कपूर अशी स्वत:चीच व्यक्तिरेखा साकारणार आहे. ‘भूतनाथ रिटर्न्स’ चित्रपटाच्या ट्रेलर अनावरणाच्या कार्यक्रमात बोलताना अमिताभ म्हणाले, या चित्रपटात रणबीर आणि मी एकत्रित दृष्य साकारलेले नाही. भविष्यात आम्ही एकत्र चित्रपट करू अशी आशा आहे. त्याच्या चित्रपटात मला एखादी छोटीशी जरी भूमिका मिळाली तरी चालेल. तो खूप लोकप्रिय आहे… माझ्यापेक्षा सुध्दा. तरुण कलाकारांबरोबर काम करणे आनंददायी अनुभव असून, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळत असल्याचे देखील ते म्हणाले.
‘भूतनाथ रिटर्न्स’मध्ये अमिताभबरोबर उषा जाधव
या चित्रपटात एका महत्वाच्या क्षणी रणबीर कपूरचा प्रवेश होतो. चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा छोटी असली तरी महत्वाची आहे. शाहरूख खानने आधीच्या ‘भूतनाथ’ चित्रपटात बांकुच्या वडिलांची भूमिका साकारली होती. यावेळी, तो सुध्दा एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असून, आधीच्या ‘भूतनाथ’ (२००८) चित्रपटात त्याने साकारलेल्या व्यक्तिरेखेला या चित्रपटात पुढे नेण्यात आले आहे. चित्रपटात अमिताभ एका मैत्रीपूर्ण भूताची व्यक्तिरेखा साकारत आहेत. प्रसिध्द रॅप गायक हनी सिंगच्या गाण्यावर अमिताभ बच्चन आणि हनी सिंग नृत्य करणार आहेत, ज्याचे अजून चित्रीकरण होणे बाकी आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी अमिताभ बच्चन यांनी पत्त्यांच्या आणि अन्य काही जादू करून दाखविल्या. दिग्दर्शन नितेश तिवारी यांचा ‘भूतनाथ रिटर्न्स’ हा चित्रपट २००८ सालच्या ‘भूतनाथ’ चा सिक्वल आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन, बोमन इराणी आणि मराठी नटी उषा जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. टी-सिरीज आणि बीआर फिल्मस् यांची निर्मिती असलेला हा चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होईल.