‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादात बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने उडी घेत विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेतर्फे प्रदर्शित करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीत रणबीरने आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत. या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या मागण्या लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत. आंदोलक विद्यार्थी आणि सरकारमध्ये अडलेले संवादाचे गाडे पूर्ववत होण्याची आवश्यकता असल्याचे रणबीरने म्हटले आहे. एफटीआयआय ही चित्रपट क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींना घडवणारी संस्था आहे. चित्रपट क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या देशभरातील अनेकांना या संस्थेमुळे संधी मिळते. एफटीआयआयमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांविषयी बाहेरच्या जगात आदर आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून संस्थेविषयी अनेक नकारात्मक गोष्टी कानावर पडत आहेत. विद्यार्थ्यांच्या इच्छेविरुद्ध संस्थेचा अध्यक्ष नेमण्यात आला आहे. मात्र, माझ्या मते याबाबतीत विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. एफटीआयआयसारख्या मोठ्या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रेरणादायी व्यक्तीमत्व असावे, एवढीच त्यांची मागणी आहे. संस्थेच्या मोठेपणाचा मुद्दा बाजुला ठेवला तरी, विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडून प्रेरणा घेता येईल, अशी व्यक्ती एफटीआयआयच्या अध्यक्षपदावर नेमावी, असे मत रणबीरने व्यक्त केले आहे.
एफटीआयआयच्या संचालक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष अभिनेते गजेंद्र चौहान यांच्यासह इतर काही सदस्यांना हटवून या संचालक मंडळाची पुर्नस्थापना करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी संप पुकारला आहे.
एफटीआयआयच्या प्रमुखपदी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असावे- रणबीर कपूर
'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया'च्या (एफटीआयआय) अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादात बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने उडी घेत विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
![एफटीआयआयच्या प्रमुखपदी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असावे- रणबीर कपूर](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2015/07/ranbir1.jpg?w=1024)
आणखी वाचा
First published on: 08-07-2015 at 06:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor supports agitating students in ftii row