अभिनेता रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ हा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात डाकूची भूमिका रणबीर साकारणार आहे. रणबीरच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात रणबीर दुहेरी भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
रणबीरच्या ‘शमशेरा’ची कथा ही स्वतंत्र्यपूर्व काळातली आहे. आपल्या हक्कांसाठी ब्रिटीशांविरुद्ध लढणाऱ्या डाकूची कहाणी या चित्रपटात आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेता असलेला रणबीर दुहेरी भूमिका साकारणार आहे. रणबीर पिता आणि मुलगा अशा दोन्ही भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. रणबीरनं दुहेरी भूमिकेत चित्रीकरणाला सुरूवात केली आहे.
रणबीर त्याच्या १२ वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे. जून २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्यावर्षी या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. ‘ज्या भूमिकेची मी इतक्या दिवसांपासून प्रतिक्षा करत होतो, अखेर ती मला शमशेराच्या माध्यमातून मिळाली आहे. मी स्वत:ला साचेबद्ध भूमिकांतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण करत आहे आणि हे नवीन आव्हान स्वीकारण्यासाठी मी तयार आहे.’ असं म्हणत रणबीरनं काही दिवसांपूर्वी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. या चित्रपटात वाणी कपूर, संजय दत्तदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे असंही म्हटलं जात आहे.