हिंदी चित्रपटसृष्टीचा लाडका ‘संजूबाबा’ म्हणजेच अभिनेता संजय दत्त याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती होते आहे, हाच मुळात बऱ्याचजणांसाठी पहिला धक्का होता. त्याचे आयुष्य नाटय़पूर्ण घटनांनी भरलेले आहे, यात वादच नाही. पण, संजय दत्तची नेमकी अशी कोणती गोष्ट चित्रपटाच्या निर्मात्याला स्पर्शून गेली की त्याने त्याच्यावर चरित्रपटच काढायचा निर्णय घेतला? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला. आता संजयवरच्या या चरित्रपटाचे दिग्दर्शन राजकु मार हिरानी करणार आहे हा दुसरा धक्का होता. आणि तिसरा धक्का चक्क हिरानीनींची दिला आहे. तो म्हणजे संजयची भूमिका करण्यासाठी रणबीर कपूरची निवड झाली आहे.

कपूर आणि दत्त कुटुंबियांमध्ये फारसे चांगले संबंध नाहीत. त्याचे मुख्य कारण म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत गाजलेली राज कपूर आणि नर्गिस यांची एकमेवाद्वितीय प्रेमकथा. आजही संजय दत्त किंवा त्यांच्या कुटुंबियांबद्दल कपूर खानदानात कोणाला विचारणा झाल्याचे ऐकिवात नाही. आणि झालीच असेल तर क पूर कुटुंबियांनी कधीही अशा प्रश्नांना उत्तर दिलेले नाही. या सगळ्या पाश्र्वभूमीवर रणबीरने संजय दत्तच्या भूमिकेसाठी दिलेला होकार हा इतरांनाच नव्हे तर त्याच्या घरच्यांनाही आश्चर्यचकित करणारा ठरला आहे. रणबीरने मात्र हा चित्रपट आणि विशेष म्हणजे संजय दत्तची भूमिका करण्याची संधी आपल्याला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
‘मुन्नाभाई’च्या तिसऱ्या सिक्वलसाठी संजय दत्तची वाट पाहणाऱ्या हिरानीने त्याच्याचवरच्या चित्रपटाचा घाट कधी घातला हे कळायला मार्ग नाही. पण, ‘पीके’च्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली असल्याने त्याने आगामी चित्रपटाची तयारी सुरू केल्याचे समजते. त्याचसाठी त्याने रणबीरची भेट घेऊन त्याचा होकार निश्चित केला. आता या निवडीमुळे लोकांमध्ये काय चर्चा होते याच्याशी आपल्याला देणेघेणे नसल्याचे हिरानींनी म्हटले आहे. हिरानींनी चित्रपटाचे काम वेगाने हाती घेतल्याचे सांगण्यात येते.  

पडद्यावर संजूची भूमिका साकारणे हे खूप कठीण काम आहे. आणि अशी भूमिका जेव्हा विश्वासाने तुमच्यावर सोपवली जाते तेव्हा ती मोठी जबाबदारी असते. संजय दत्तचे आयुष्य हे एखाद्या रोलर कोस्टरप्रमाणे उभे-आडवे असे राहिलेले आहे.
 रणबीर कपूर

Story img Loader