झोया अख्तर दिग्दर्शित रणवीर- आलियाचा ‘गली बॉय’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ‘हा चित्रपट माझा आहे आणि या चित्रपटात माझ्याव्यतिरिक्त दुसऱ्या अभिनेत्याची जर निवड झाली असती तर मला ते सहनच झालं नसतं अशा भावना ट्रेलर लाँचिगच्या वेळी रणवीरनं व्यक्त केल्या. मात्र रणवीर आधी रणबीर कपूरनं या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी आपली रुची दाखवली होती.

अडीच वर्षांपूर्वी चित्रपटाची दिग्दर्शिका झोया अख्तर मुख्य कलाकाराच्या शोधात होती. चित्रपटाची कथा रणबीर कपूरला खूपच भावली होती. त्यानं या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र मुख्य भूमिकेसाठी रणबीरऐवजी रणवीर साजेसा ठरेल असं झोयाला वाटत होतं त्यामुळे रणबीरला तितक्याच ताकदीची पण दुसरी भुमिका झोयानं देऊ केली. मात्र नंतर रणबीरनं चित्रपटातून माघार घेतली नाहीतर आज रणबीर ‘गली बॉय’ चित्रपटात पाहायला मिळाला असता.

मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिवाईन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader