बॉलीवूडमधील काही बड्या कलाकारांच्या यादीत येणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे रणबीर कपूर (Ranbir Kapoor). ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचा मुलगा रणबीर कपूरने त्याच्या अभिनयाने इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं. रणबीर कपूरने २००७ मध्ये ‘सावरिया’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्याला फारसं यश मिळालं नाही, पण त्यानंतर त्याने एकामागून एक अनेक कॉमेडी आणि रोमँटिक चित्रपट करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं.
‘वेक अप सिड’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘रॉकस्टार’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘ए दिल है मुश्किल’, ‘बर्फी’, ‘संजू’ आणि ‘अॅनिमल’ अशा अनेक चित्रपटांतून त्याने लोकप्रियता मिळवली. त्याचं ‘अॅनिमल’ हा चित्रपट २०२३ मधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक बनला आणि त्याला अद्भुत प्रतिसाद मिळाला. रणबीर ‘अॅनिमल पार्क’ या चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग करत आहे. शिवाय तो ‘लव्ह अँड वॉर’ मध्येदेखील दिसणार आहे. अशातच आता तो हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
रणबीर हॉलीवूडच्या अॅक्शन मास्टर मायकेल बे यांच्या दिग्दर्शनाखाली पदार्पण करणार आहे. मायकेल बे आगामी बाँड चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे वृत्त आहे. टेलीचक्करच्या वृत्तानुसार, चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी निर्मिती संस्थेच्या टीमने रणबीरशी चर्चा सुरू केल्या आहेत. ब्रिटीश अभिनेता चिवेटेल एजिओफोर देखील या चित्रपटात सामील होण्याची शक्यता आहे.

जून २०२५ मध्ये शूटिंग सुरू होण्याची अपेक्षा असलेल्या या चित्रपटात नवीन कलाकारांची निवड केली जात आहे आणि यात रणबीरचीही एखादी मोठी भूमिका असू शकते. अर्थात यारणबीर कपूर आणि मायकेल बे यांच्या टीमने या वृत्तांना दुजोरा दिलेला नाही. पण रणबीरच्या हॉलीवूडमधील पदार्पणाचं वृत्त समजताच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेकांनी त्याच्या हॉलीवूड पदार्पणावर आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, रणबीर लवकरच नितेश तिवारींच्या ‘रामायण’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीरबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आणि अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अरुण गोविल राजा दशरथ यांच्या भूमिकेत आहेत. याबरोबरच रणबीर संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्याबरोबर ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाचीही तयारी करत आहे.