कधी तळ्यात कधी मळ्यात अशी अवस्था रणबीर कपूर आणि कतरिना कैफची झाली आहे. ते दोघेही लग्न कधी करणार? हा एकच प्रश्न उरला असतानाच त्यांचे प्रेमप्रकरण संपुष्टात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या. ते एकमेकांना कसे टाळत आहेत, जाणीवपूर्वक एकमेकांपासून दूर झाले आहेत, अशा चर्चामुळे त्यांच्या प्रेमप्रकरणाचा धुरळा खाली बसला होता. पण, त्यांच्या या अजब प्रेमाची गजब गोष्ट सध्या गुपचूप सुरू असून लग्नाच्या दृष्टीने या दोघांनी आणखी एक पाऊल पुढे टाकल्याचे समजते.
त्यांच्या प्रेमभंगाच्या बातम्या येण्याआधीच रणबीरची आई आणि कतरिनाची आई यांनी लंडनमध्ये घेतलेल्या भेटीगाठी सर्वांपर्यंत पोहोचल्याच होत्या. दरम्यान या दोघांनीच एकमेकांशी अबोला धरल्याने प्रकरण संपल्यातच जमा झाल्याची अटकळ बांधली जात होती. पण, आता हे दोघेही पुन्हा एकदा ‘जग्गा जासूस’च्या निमित्ताने एकत्र आले असून मध्यंतरी झालेल्या भांडणतंटय़ानंतर त्यांचे नाते पहिल्यापेक्षा अधिक बळकट झाल्याचे बोलले जात आहे. एवढेच नव्हे तर आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीशी रणबीरने कतरिनाची जाणीवपूर्वक भेटही घडवून आणली.
रणबीरचे त्याच्या आजीवर कृष्णा कपूर यांच्यावर नितांत प्रेम आहे. त्यामुळे कतरिनाबद्दल आजीचे मत जाणून घेण्यासाठी त्याने नुकतीच या दोघींची भेट घडवून आणली. आजीने कतरिनावर शिक्कामोर्तब केले की नाही हे अजून गुलदस्त्यात आहे. आपल्या या प्रेमापोटी कतरिनाने ‘कान’ महोत्सवाची ग्लॅमरस वारी करण्याचेही नाकारले आहे. कतरिना ‘लॉरिएल’ची राजदूत असल्याने ऐश्वर्या आणि सोनम कपूर यांच्याप्रमाणेच तिनेही ‘कान’ महोत्सवात रेड कार्पेटवर ‘लॉरिएल’चे प्रतिनिधीत्व करणे ही गरज होती. मात्र, त्याचवेळी ‘जग्गा जासूस’चे चित्रिकरण होणार आहे. हा चित्रपट रणबीर आणि अनुराग बसूच्या होम प्रॉडक्शनची पहिली निर्मिती असल्याने त्याचे महत्व कतरिनासाठी सर्वात जास्त आहे. याच कारणास्तव केवळ रणबीरला दुखवावे लागू नये म्हणून कतरिनाने ‘कान’वारी करण्यास नम्रतेने नकार दिल्याचे समजते.

Story img Loader