दिवंगत बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचा शर्माजी नमकीन हा शेवटचा चित्रपट आज ३१ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांचे कुटुंबीय आणि चाहते भावूक झाले. हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता, जो पूर्ण करण्यापूर्वी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ऋषी कपूर यांचा मुलगा आणि बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने हा चित्रपट पाहिल्यानंतर ऋषी कपूर यांचे मोठे भाऊ रणधीर कपूर यांनी काय प्रतिक्रिया दिली हे सांगितले.
एनडीटीव्हीशी बोलताना रणबीरने सांगितले की, “शर्माजी नमकीन पाहिल्यानंतर रणधीर कपूर यांनी ऋषी कपूर यांच्याशी फोनवर बोलायचे होते. ते मला म्हणाले, ऋषीला फोन कर. आपण त्याच्या कामाचे कौतुक करायला हवे. चित्रपट पाहिल्यानंतर ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, पप्पाला सांग, त्यांने खूप चांगले काम केले आहे. तो कुठे आहे? चला त्याला कॉल करूया,” त्यांची ही प्रतिक्रिया ऐकून रणबीर भावूक झाला.
रणबीरने सांगितले की, “रणधीर कपूर यांना डिमेंशिया नावाचा आजार आहे. ते या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. ज्यात त्यांना बहुतेक गोष्टी आठवत नाहीत. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना पप्पांना भेटायचे होते कारण ते आता या जगात नाही हे त्यांना आठवत नाही.
ऋषी कपूर यांच्या निधनाला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. पण रणधीर यांना त्यांचे भाऊ ऋषी आणि राजीव यांच्या निधनाने धक्का बसला आहे. त्यांचे आपल्या भावांवर खूप प्रेम होते. ही गोष्ट त्यांनी यापूर्वीही अनेकदा सांगितली आहे. पण आता त्यांना अनेक गोष्टी आठवत नाहीत, त्यामुळे ऋषी कपूर यांचं निधन झाल्याचंही ते विसरतात.
डिमेंशिया आजार काय आहे?
डिमेंशिया नावाच्या या आजारामुळे व्यक्तीच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे तो गोष्टी विसरायला लागतो. हा एक असाध्य रोग आहे, जो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. या आजारात औषधांच्या मदतीने व्यक्ती स्थिर राहू शकतो.