‘स्टार प्रवाह’वर सुरु झालेल्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील सौंदर्या इनामदार म्हणजेच हर्षदा खानविलकर यांच्या लूकची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. सौंदर्या इनामदारचा लूक डिझाइन केलाय कॉश्च्युम डिझायनर शाल्मली टोळ्येने. शाल्मली स्वत: एक अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगनाही आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतला हर्षदा यांचा लूक डिझाइन करणं शाल्मलीसाठी एक मोठं आव्हान होतं. याआधी हर्षदा यांच्या ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतल्या अक्कासाहेब या व्यक्तिरेखेला तुफान लोकप्रियता मिळाली होती. अक्कासाहेबांच्या साड्या आणि दागिने यांचं महिलावर्गात विशेष आकर्षण होतं आणि आजही आहे. त्यामुळे सौंदर्याचा लूक डिझाइन करताना या गोष्टी प्रामुख्याने टाळल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सौंदर्या इनामदार ही अतिशय हुशार आणि करारी अशी बिझनेस वुमन आहे. नावातच सौंदर्य आहे. त्यामुळे सौंदर्यावर प्रेम करणारी अशी व्यक्तिरेखा आहे. त्यामुळे त्या व्यक्तिरेखेला शोभेल असा पेहराव डिझाइन करण्यात आलाय. मॉडर्न पण परंपरेला धरुन असा मिलाफ साधण्याचा प्रयत्न सौंदर्याच्या लूकसाठी करण्यात आलाय. कमीत कमी पण हमखास छाप पाडणारे दागिने सौंदर्याच्या व्यक्तिरेखेसाठी वापरण्यात आले आहेत आणि हीच या व्यक्तिरेखेची खासियत आहे असं शाल्मलीला वाटतं. हर्षदाच्या या लूकलाही प्रेक्षकांची पसंती मिळते आहे याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया शाल्मलीने व्यक्त केली.

शाल्मली टोळ्ये

आणखी वाचा :’पानिपत’मधील डोळ्यांचं पारणं फेडणारं अजय-अतुलचं ‘मर्द मराठा’ गाणं 

सौंदर्या इनामदारच्या व्यक्तिरेखेला मिळणाऱ्या प्रसिद्धीविषयी सांगतना हर्षदा म्हणाली, “कोणतीही व्यक्तिरेखा साकारताना ती कशी दिसते हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. लूक डिझाइन करताना त्यात मी माझी मतं मांडत असते. पण यावेळी मात्र सौंदर्याच्या लूकचं संपूर्ण श्रेय जातं कॉश्च्युम डिझायनर शाल्मली टोळ्येला. तिने उत्तमरित्या माझा लूक डिझाइन केलाय. अक्कासाहेबांच्या पेहरावाची छाप सौंदर्याच्या लूकमध्ये दिसत नाही. मला वाटतं हेच या व्यक्तिरेखेचं यश आहे. आता पर्यंत अक्कासाहेबांच्या भूमिकेमधून प्रेक्षकांनी माझ्यावर भरभरुन प्रेम केलंय.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rang maza vegla harshada khanvilkar look designed by this actress ssv