मराठी सारस्वतांचा महाउत्सव असलेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’तील काव्य वाचनाच्या कार्यक्रमाला आजही तुफान प्रतिसाद मिळतो आहे. अन्य ठिकाणीही काव्यवाचनाचे कार्यक्रम सादर होत असतात. मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर यांनी काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम करून रसिकांमध्ये ‘काव्यवाचन’ हा प्रकार लोकप्रिय केला. विविध कवितांचा दृक-श्राव्य अनुभव देणारा ‘रंग नवा’ हा कार्यक्रम नव्या पिढीतील अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने रंगभूमीवर सादर केला असून त्याच्या प्रयोगांनाही सुरुवात झाली आहे. त्या निमित्ताने..
‘कविता’ म्हणजे  नेमके काय? तर त्याची व्याख्या प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे करेल. आपल्या मनाला भावते आणि ज्या शब्दांशी आपण समरस होतो ते शब्द म्हणजे कविता असे काहींना वाटते. तर मनात अगदी आतून कुठे तरी जे उचंबळून ओठावर किंवा शब्दरूपात समोर येते ती म्हणजे कविता, असेही काही जणांचे म्हणणे असते. कधी हा अनुभव आनंदाचा तर कधी दु:ख/वेदना व्यक्त करणारा असतो. अमुक प्रकाराने केलेली शब्दरचना म्हणजेच कविता असेही सांगता येत नाही. कारण, कविता ही वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटत असते. ती यमकात बांधलेली तर कधी मुक्त छंदातीलही असू शकते. अनेकदा ही कविता फक्त आपल्या स्वत:पुरतीच असते तर कधी तिचा सामूहिक आविष्कार होत असतो आणि त्यात शे-दीडशे नव्हे तर हजारो श्रोते सहभागी झालेले असतात. हा आविष्कार असतो काव्यवाचनाचा किंवा काव्यमैफलीचा.  मराठी सारस्वतांचा महाउत्सव असलेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’तील काव्यवाचनाच्या कार्यक्रमाला आजही तुफान प्रतिसाद मिळतो. याखेरीज अन्य ठिकाणीही काव्यवाचनाचे कार्यक्रम सादर होत असतात. मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर यांनी जाहीर काव्यवाचनाचे कार्यक्रम करून रसिकांमध्ये ते लोकप्रियही केले. आज काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम होतही असतात. आता अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने विविध कवितांचा दृक-श्राव्य अनुभव देणारा ‘रंग नवा’ हा कार्यक्रम रंगभूमीवर सादर करण्याचे ठरविले असून त्याच्या प्रयोगांनाही सुरुवात झाली आहे. कार्यक्रमाची संकल्पना-दिग्दर्शन मुक्ता बर्वे व मिलिंद जोशी यांचे असून निर्मिती मुक्तासह दिनेश पेडणेकर यांनी केली आहे.
पु. ल. आणि सुनीताबाई देशपांडे यांनीही कविवर्य बा. भ. बोरकर आणि बा. सी. मर्ढेकर यांच्या कवितांचे जाहीर वाचन करण्याचे कार्यक्रम केले. त्यांना रसिकांचाही उत्तम प्रतिसाद लाभला. मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर यांच्या अगोदरही बा. भ. बोरकर, संजीवनी मराठे, कवी गिरीश, कवी यशवंत, वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज, सोपानदेव चौधरी यांनीही काव्यवाचनाचे कार्यक्रम केले होते. मात्र, पाडगावकर, बापट आणि करंदीकर या त्रयींनी काव्यवाचन कार्यक्रमाला एक ‘ग्लॅमर’ मिळवून दिले असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कवी आणि गझलकार सुरेश भट, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ यांनीही आपल्या कवितांचे कार्यक्रम सादर केले.  
अलीकडच्या काही वर्षांत नव्या पिढीला आणि तरुणाईला कवितांचे वेड लावण्यात संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि कवी संदीप खरे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या दोघांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम ज्येष्ठ पिढीला तर भावलाच, पण तरुणाईनेही त्याला आपले म्हटले. प्रा. विसुभाऊ बापट यांनी ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या कार्यक्रमातूनही विविध कवींच्या कविता लोकांपर्यंत पोहोचविल्या. अशोक बागवे, महेश केळुस्कर, अरुण म्हात्रे, नलेश पाटील या मंडळींनीही गेल्या काही वर्षांत कविता वाचनाचे अनेक कार्यक्रम सादर करून त्यांच्या स्वत:च्या आणि अन्य कवींच्या कविता रसिकांपर्यंत नेल्या. अशोक नायगावकर, रामदास फुटाणे यांनी हास्य/विनोदी कविता तसेच वात्रटिकांचा पट रसिकांसमोर उलगडला आणि त्यांना पोट धरून हसविले   गायक विनायक जोशी व संगीतकार उदय चितळे हे ‘गीत नवे गाईन मी’ हा कार्यक्रम सादर करतात. यात मराठीतील निवडक कवींच्या कविता विनायक जोशी व रंजना जोगळेकर गाऊन सादर करतात. बा. भ. बोरकर यांच्या कवितांवर आधारित ‘जीवन त्यांना कळले हो’, ‘जिणे गंगौघाचे पाणी’ हे कार्यक्रमही सादर झाले आहेत.
संगणक आणि भ्रमणध्वनी युगाच्या काळातही काव्यवाचन/सादरीकरण कार्यक्रमांना रसिक श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. रंगभूमीवर किंवा अन्य व्यासपीठावरून  काव्य सादरीकरणाचा ‘नवा’ प्रयोग सादर करण्याची प्रेरणा अनेकांना मिळते ही मराठी भाषा व कवितेसाठी चांगली गोष्ट आहे. त्यामुळेच शब्दांवर प्रेम करणारे रसिक जोपर्यंत आहेत तोपर्यंत काव्यवाचनाचे किंवा कविता सादरीकरणाचे कार्यक्रम आजवर झाले, होत आहेत आणि यापुढेही सादर होत राहतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कवितेचे गाणे झाले की ते जवळचे वाटते-मुक्ता बर्वे
मला स्वत:ला एक रसिक प्रेक्षक म्हणून जे पाहायला आवडेल ते आपण सादर करू, असे मी निर्माती झाले तेव्हा सांगितले होते. त्याचा पुढचा भाग म्हणून ‘रंग नवा’ हा कार्यक्रम. प्रेक्षकांना चांगले काही दिले तर त्याला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळतो. कदाचित ते रुजायला वेळ लागत असेल, पण रसिक त्याचा स्वीकार करतातच. ‘रंग नवा’मध्ये मंगेश पांडगावकर, कुसुमाग्रज, शांता शेळके, ना.धों. महानोर, आरती प्रभू, सदानंद डबीर, प्रा. अशोक बागवे, सौमित्र आदींच्या कविता असतील. यातील काही कवितांना संगीतकार मिलिंद जोशी यांनी संगीतबद्ध केले असून, त्या गाण्यांच्या स्वरूपात तर काही काव्यवाचन/सादरीकरण या प्रकारात सादर करणार आहोत. कवितेचे गाणे झाले की ते अधिक जवळचे वाटते. मराठीतील काही चांगल्या कविता या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे.   
तरुण पिढीला कविता निश्चितच आवडते-संदीप खरे
आमच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाला अगदी लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंतच्या पिढीतील रसिकांचा अलोट असा प्रतिसाद मिळाला आहे. यात तरुणांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला कविता निश्चितच आवडते. फक्त ती त्यांच्यापर्यंत आपण कशी पोहोचवितो हा खरा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमचा हा कार्यक्रम अत्यंत अनौपचारिक आणि घरगुती मैफलीसारखा असतो, उपस्थित श्रोतेही त्यात मनापासून सहभागी होतात. तरुण वय हे वेडे होण्याचेच असते आणि थोडे वेड लागले तरच कविता करता येते. कविता श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ती मुळात कसदार आणि गुणवत्तापूर्ण असली पाहिजे आणि तरुणाईला आवडेल, रुचेल अशा प्रकारे त्यांच्या शैलीत ती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. मी आणि डॉ. सलील कुलकर्णी यांनी रसिक तसेच तरुणाईपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rang nava lets enjoy marathi poetry