‘मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे’, ‘चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसुनि आले रंग प्रीतीचे’, ‘मोरया मोरया’ आणि ‘परवर दिगार, परवर दिगार’ या आणि अशा आणखी काही गाजलेल्या गाण्यांनंतर आता प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या आवाजातील ‘रंग तू..’ हे नवीन मराठी प्रेमगीत त्यांच्या चाहत्यांना ऐकायला मिळणार आहे.
‘सौ. शशी देवधर’या आगामी मराठी चित्रपटासाठी महादेवन यांनी पाश्र्वगायन केले आहे. या चित्रपटाचे संगीत हिंदीत गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या शर्मा बंधू यांचे आहे. संगीतकार म्हणून त्यांनी ‘टबी-परीक’ हे नाव घेतले आहे. अमोल शेटगे दिग्दर्शित या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेले हे गीत आशिष कुलकर्णी यांचे आहे.
महादेवन यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले की, टबी-परिक सोबत मी गेली २० वर्षे काम करतोय. माझ्या ‘ब्रेथलेस’पासून आम्ही एकत्र आहोत. मराठी चित्रपटासाठी नव्या वर्षांत पाश्र्वगायन केलेले हे माझे पहिलेच गाणे आहे. हे गाणे करताना खूप मजा आली. मराठी माझ्यासाठी आता नवीन किंवा अवघड नाही. या अगोदरही मी मराठीत गायलो आहे. मराठीत गाताना एक वेगळाच आनंद मिळतो.
तर संगीतकार टबी-परिक जोडीतील इंद्रजीत शर्मा उर्फ टबी म्हणाले की, ‘थोडे तुझे नी थोडे माझे’ हा आमचा पहिला मराठी चित्रपट होता. त्यानंतर आता ‘सौ. शशी देवधर’ करतोय. शंकर महादेवन आणि आमचे केवळ व्यावसायिक नव्हे तर कौटुंबिक संबंध आहेत. जेव्हा चित्रपटाचे संगीत आम्ही करणार हे नक्की झाले तेव्हाच ‘रंग तू’ हे गाणे शंकर महादेवन यांच्याकडूनच गाऊन घ्यायचे आम्ही नक्की केले. कारण हे गाणे त्याच्याशिवाय दुसरे कोणी गाऊ शकणार नाही, असे आम्हाला वाटले. या गाण्यासाठी त्यांना विचारले आणि त्यांनीही लगेच होकार दिला. तर गीतकार आशिष कुलकर्णी म्हणाले की, इतक्या मोठय़ा उंचीवर पोहोचल्यानंतरही शंकर महादेवन यांचे वागणे आणि बोलणे साधे आहे. गाण्याच्या ध्वनिमुद्रणासाठी येताना ते पूर्ण अभ्यास करून आणि तयारीने आले होते. मी गाण्याचा कागद त्यांच्या हातात दिल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ते गाणे मोठय़ाने वाचून दाखविले. नायिकेवर असलेले आपले प्रेम आत्ता व्यक्त करू की नको अशा पेचात पडलेल्या नायकाची मनस्थिती या गाण्यात दाखविण्यात आली आहे.     
रंग तू, ढंग मी
मेळ साधू कसा
दंग होउनिया साहतो
स्वप्न तू नेत्र मी
सांग जागू कसा
रात दिन बस तुला पाहतो.
    -आशिष कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा