मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी नव्वदच्या दशकापासून वैविध्यपूर्ण भूमिका साकारते आहे. २०१४ साली आलेल्या ‘मर्दानी’ या चित्रपटातून राणी मुखर्जी पोलीस अधिकारी शिवानी रॉय म्हणून अॅक्शन भूमिकेतून मोठ्या पडद्यावर आली आणि तिने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने थक्क केले. आता या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण होत असताना, यश राज फिल्म्सने राणीच्या ‘मर्दानी’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. ‘मर्दानी’ चित्रपटाचा दुसरा भाग २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘मर्दानी २’ प्रदर्शित झाल्याच्या पाच वर्षांनंतर यश राज फिल्म्सने २२ ऑगस्ट रोजी ‘मर्दानी’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा करत समाज माध्यमांवर एक ध्वनीचित्रफीतही पोस्ट केली आहे.
हेही वाचा >>> एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता
‘मुंबईमध्ये महिला पोलिसांसाठी ३३ टक्के राखीव पदं आहेत. ही पदं लवकरात लवकर भरली जाणं आवश्यक आहे आणि मी या चित्रपटाच्या निमित्ताने आवाहन करते की अधिकाधिक महिलांनी पोलीस दलात भरती व्हावं आणि समाज हितासाठी मदत करावी’ असं आवाहन या चित्रपटाच्या निमित्ताने राणीने केलं आहे. स्त्रियांना पोलीस दलात काम करण्याची प्रेरणा मिळावी हा आपला या चित्रपटामागचा हेतू असल्याचे राणीने समाजमाध्यमांवर स्पष्ट केले आहे. या चित्रपटात मी साकारलेल्या शिवानी रॉय या मुख्य पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेवरून प्रेरित होऊन एखादी महिला प्रत्यक्षात पोलिस दलात भरती झाली तर या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटेल, अशी भावनाही राणीने व्यक्त केली आहे. ‘मर्दानी’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच राणी मुखर्जीचा अॅक्शन अवतार प्रेक्षकांना अनुभवता आला. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मर्दानी’चे दिग्दर्शन प्रदीप सरकार यांनी केले होते. तर २०१९ साली आलेल्या सिक्वेलचे दिग्दर्शन गोपी पुथरन यांनी केले होते. आता तिसऱ्या सिक्वेलपटाचे दिग्दर्शन कोण करणार याचीही उत्सुकता आहे.