आदित्य चोप्राशी विवाह होण्यापूर्वीही ‘यशराज’ प्रॉडक्शनचं कुटुंब तिच्या आयुष्यात होतं आणि आता ती स्वत:च त्या कुटुंबाचा भाग आहे. पण, ते तेव्हाही बरोबरच होतं आणि आताही ते माझ्याबरोबरच आहे. माझ्यासाठी काहीच बदललेलं नाही.. हम तो ऐसेही है भैय्या.. असं एकच वाक्य ती तिच्याविषयी सतत म्हणत असते. पण, तोंडाने मात्र अखंड ‘आदित्य’ आणि आता ‘मर्दानी’ एवढीच बडबड सुरू असते. कारण, या दोन्ही नावांबरोबर माझ्या आयुष्याची आणि कारकिर्दीची नवी इनिंग सुरू झाली आहे, असे राणीचे म्हणणे आहे. मला लवकरात लवकर आई व्हायचं आहे..
मला लवकरात लवकर आई व्हायचं आहे..
यशराज प्रॉडक्शनचा सर्वेसर्वा आदित्य चोप्राशी विवाहबद्ध झाल्यानंतर राणीच्या चित्रपटांपेक्षाही तिच्या वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा जास्त होते. राणीलाही आता हे अंगवळणी पडलं असल्याने ती स्वत:हूनच धडाधड चर्चेतल्या गोष्टींना सुरुवात करते. सध्या ती आई होणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. त्यामुळे तिने त्यापासूनच सुरुवात केली. अजून तरी मला मातृत्वाची चाहूल लागलेली नाही. उलट, तसं झालं तर तुमच्या तोंडात साखर पडो.. असंच मी म्हणेन. मला लवकरात लवकर आई व्हायचं आहे. तुमचा व्यवसाय काहीही असो, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात थोडय़ाफार फरकाने या घटना येत असतात. त्यामुळे आई होणं म्हणजे कारकीर्द संपवणं वगैरे असं काही माझ्याबाबतीत नाही. गर्भवती असतानाही एखाद्या दिग्दर्शकाने माझ्याबरोबर चित्रपट करायची इच्छा व्यक्त केली तर मी नाही म्हणणार नाही. जोपर्यंत मला काम करता येईल तोपर्यंत मी करणारच. मात्र, एकदा बाळाचा जन्म झाल्यानंतर प्रत्येक आईला त्याला जो वेळ द्यावा लागतो तो मीही देणार. बाळाच्या जन्मानंतर त्याचे नीट पालनपोषण करणं ही आईची जबाबदारी असते. त्यामुळे ते व्यवस्थित शहाणं होईपर्यंत मला कारकिर्दीला स्वल्पविराम द्यावा लागेल तेवढा मी नक्की देणार. पण, मला लवकर आई व्हायचं आहे.. असं राणीने सांगितलं.
‘मर्दानी’ म्हणजे कारकिर्दीच्या दुसऱ्या पर्वाची सुरूवात..
आत्ता या वळणावर ‘मर्दानी’सारखा चित्रपट म्हणजे माझ्यासाठी सोपी गोष्ट नाही. या चित्रपटात मी गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची भूमिका केली आहे. आजवर आपण कित्येक चित्रपटांमधून पोलिसांच्या भूमिका पाहिलेल्या आहेत. पण, गुन्हे अन्वेषण विभागाचे काम पूर्णपणे वेगळे असते. एक महिला पोलीस आणि तीही अशा कार्यक्षम विभागातली म्हटल्यावर माझं संपूर्ण व्यक्तिमत्त्व त्या पद्धतीने असायला हवं ही चित्रपटाची गरज होती, असं राणीने सांगितलं. ती आदित्य चोप्राची पत्नी असल्याने यशराज बॅनरचे चित्रपट तिला सहजी मिळतील, ही गोष्टही साफ चुकीची आहे, असं ती सांगते. २००७ साली मी यशराजचा चित्रपट केला होता. त्यानंतर आता मी ‘मर्दानी’ करते आहे. तेही या चित्रपटाची कथा यशराज प्रॉडक्शनकडे आली होती. त्यांनी रीतसर मला भूमिकेसाठी विचारलं आणि अशा प्रकारची आव्हानात्मक भूमिका, कथा मला आवडली म्हणून मी होकार दिला, असं तिने सांगितलं. पण, ही भूमिका करताना मुळात पोलीस रोज काय आणि कसे काम करतात हे जाणून घेणं आवश्यक होतं. गुन्हे अन्वेषण विभाग नेमका काय करतो, याची माहिती असणं आवश्यक होतं. त्या गोष्टी मी स्वत: पोलिसांना भेटून त्यांच्याकडून जाणून घेतल्यात. ‘मर्दानी’मधली अॅक्शन दृश्येही खरी आहेत. म्हणजे नेहमीच्या हिंदी चित्रपटात हिरो जे स्टंट करतात ते इथे नाहीत. रीतसर प्रशिक्षण घेऊन पोलीस कुठल्या पद्धतीने गुन्हेगारांना पकडतात त्याचा अभ्यास करून ते वास्तव पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे राणीने सांगितले. या चित्रपटासाठी एवढी मेहनत घेतली आहे. एक तर लग्नानंतर म्हणा ही माझी पुन्हा एकदा नवी सुरुवात आहे. त्यामुळे ‘मर्दानी’त प्रेक्षक मला कसे स्वीकारतात, याबद्दल खरोखरच धाक धूक वाटत असल्याचंही राणीने सांगितलं.
आदित्य चोप्रा नावाचं रसायन माझ्यासाठी गूढ नाही..
यश चोप्रा हे बॉलिवूडमधले दिग्गज दिग्दर्शक होते. मात्र, ते कधीच प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर राहिलेले नाहीत. सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही ते सगळ्यांशी मिळूनमिसळून वागत होते. आदित्य चोप्राचं वागणं हे बरोबर त्यांच्या उलट आहे. तो कधीही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत नाही. निदान राणीसारख्या बोलघेवडय़ा अभिनेत्रीबरोबर विवाह झाल्यानंतर तरी आदित्य चोप्रा बदलेल, अशी अटकळ होती. असं सांगितल्यावर राणी हसत सांगते, ‘माझ्याशी लग्न झाल्यानंतर तर आदित्य चांगलाच कात्रीत सापडला आहे’. कुठून एका अभिनेत्रीशी लग्न करण्याची बुद्धी मला सुचली? तुझ्याशी लग्न झाल्यामुळे लोकांनी कुठून कुठून माझी जुनी छायाचित्रे काढून तीच तीच वापरण्याचा सपाटा लावला आहे. हे सगळं तुझ्यामुळे होतंय, असं तो आपल्याला नेहमी म्हणत असल्याचं राणी सांगते.
आदित्यचं प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर राहण्याचं कारण आपल्याला पटतं आणि म्हणूनच तो आपल्याबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांना येत नाही, याबद्दल कुठलीही तक्रार नसल्याचं तिने सांगितलं. आदित्य फार लहानपणापासून चित्रपटांशी जोडला गेला आहे. यश चोप्रा हे नावच एवढं मोठं होतं की त्याच्या नकळत्या वयापासून तो ‘यशराज’ आणि चित्रपटांच्या विश्वाशी जोडला गेला आहे आणि त्याला त्याच विश्वात राहायला आवडतं. वेगवेगळे चित्रपट पाहणं, पटकथा वाचणं, निर्माता-दिग्दर्शकांबरोबर चर्चा करणं हेच त्याचं जग झालं आहे. आणि त्याला कायम कथा, चित्रपटांशी जोडलेलं राहणं आवडतं. एकदा का तो या ग्लॅमरच्या झोतात आला की तो त्या विश्वापासून तुटणार, हे त्याला माहीत आहे आणि ते टाळण्यासाठी तो सगळ्यांपासून दूर राहतो. त्याचं म्हणणं मला मनापासून पटलं असल्याने माझी काहीही तक्रार नाही. जोपर्यंत आदित्य चोप्रा हे रसायन माझ्यासाठी गूढ नाही, तोपर्यंत आनंदीआनंद आहे, असं राणी म्हणते.
मी कायम चित्रपट करत राहणार..
वयाच्या सतराव्या वर्षांपासून मी चित्रपटात काम करते आहे. मला अभिनयाशिवाय दुसरं काही करता येत नाही. त्यामुळे काहीही झालं तरी मी चित्रपट करतच राहणार, असं राणीने सांगितलं. मी आता काम करू नये, असं आदि कधीच सांगणार नाही. तो स्वत: एक सर्जनशील दिग्दर्शक आहे. त्यामुळे कथेनुसार कलाकारांना कसं काम करावं लागतं हे त्याला माहिती आहे. एखादी कथा मला आवडली तर मी चित्रपट करणार. त्यात तू हा चित्रपट करू नकोस, असे दृश्य देऊ नकोस, असे सल्ले देण्याचं काम तो कधीच करणार नाही. तो स्वत:च यशराजच्या कामामध्ये एवढा व्यग्र असतो की मुद्दाम म्हणून माझ्यासाठी आलेली पटकथा वाच, त्यात कोणाबरोबर काम कर-करू नकोस असं सांगण्याएवढा वेळ त्याच्याकडे अजिबात नाही. त्यामुळे तो कधीच यात ढवळाढवळ करणार नाही, असं ती म्हणते.
दुसरी गोष्ट म्हणजे तो स्वत: आजच्या काळात जगणारा माणूस असल्याने आपल्या पत्नीने घरात राहून केवळ स्वयंपाक करावा, मुलं सांभाळावी असा विचार तो कधीच करत नाही. उलट, तो जसा स्वतंत्रपणे, निर्भीडपणे काम करतो तसंच त्याच्या पत्नीनेही कामाच्या बाबतीत स्वतंत्र असावं. एकमेकांचा आदर करत दोघांनीही आपापलं स्थान निर्माण करावं या विचाराचा तो असल्याने माझं चित्रपटात काम करणं थांबण्याची शक्यताच नाही. जितकी वर्षे जमेल तितकी वर्षे आपल्याला चित्रपटांतून काम करायचे आहे, असे राणी म्हणते.
आदित्य चोप्राशी लग्न झालं म्हणून तीही ‘यशराज’ची सर्वेसर्वा झाली असं तिच्याबाबतीत म्हटलं जातं तेही अजिबात खरं नाही, असं ती सांगते. यशराजमध्ये ढवळाढवळ करण्याचे अधिकार मला नाहीत. मी चित्रपटातून काम करते, जेव्हा काम नसेल तेव्हा इतरांप्रमाणेच नवऱ्याची वाट बघत घरात बसते, घरचे व्याप सांभाळते, असं तिचं म्हणणं आहे. मी का यशराजमध्ये जाऊ? मी नव्हते आदित्य चोप्राला मागणी घालायला गेले? चोप्रांनी मला ‘बहू’ म्हणून स्वीकारलं आहे. मी ‘राणी मुखर्जी’ आहे आणि कायम तशीच राहणार असं ठणकावून सांगत पुन्हा एकदा ती ‘हम तो ऐसेही है भैय्या.. वर येऊन थांबते.
हम तो ऐसेही है भैय्या..
आदित्य चोप्राशी विवाह होण्यापूर्वीही ‘यशराज’ प्रॉडक्शनचं कुटुंब तिच्या आयुष्यात होतं आणि आता ती स्वत:च त्या कुटुंबाचा भाग आहे.
First published on: 17-08-2014 at 02:10 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rani mukherjee say want to be mother soon