आगामी चित्रपटात राणी मुखर्जी एका महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करतेय हे आता गुपित राहिलेले नाही. आतापर्यंत चित्रपटात महिला पोलीस अधिकाऱ्याची प्रतिमा तशी उथळच दाखविण्यात आली आहे. आपल्या आगामी चित्रपटात कठोर महिला अधिकाऱ्याची भूमिका करीत असल्यामुळे ती वास्तववादी व्हावी, अशी इच्छा प्रकट करीत राणीने मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाची वारी करण्याचे ठरविले. त्यातूनच प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याला भेटण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंधेरी युनिटच्या कार्यालयात अवतरली.
गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त हिमांशू रॉय यांच्यासह काही वरिष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करणाऱ्या राणीला प्रत्यक्षात गुन्हे अन्वेषण करणाऱ्या महिला अधिकाऱ्याला भेटायचे होते.. तिच्याशी बोलायचे होते, समजून घ्यायचे होते.. पुरुष अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतीत ती कशी वावरते, हे राणीला जाणून घ्यायचे होते.. याचसाठी राणीने रविवारची संध्याकाळ गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंधेरी युनिटमध्ये घालविली.
तब्बल अडीच तास राणी या कार्यालयात होती. वरिष्ठ निरीक्षक दीपक फटांगरे आणि पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना रासम यांच्याकडून अनेक बारीकसारीक टिप्स तिने जाणून घेतल्या. महिला पोलीस अधिकारी गणवेशात नसतात तेव्हा कुठला पोषाख परिधान करतात. पायात चप्पल असते की बूट.. यापासून कामाच्या वेळा, कार्यालयात बसण्याची पद्धत आणि अगदी पुरुष सहकाऱ्यांसोबत वावरणे असो, आदी बाबी अगदी मांडी घालून राणी ऐकत होती. गुन्ह्य़ाची उकल करताना आपल्या टीमसह होत असलेल्या बैठका, आरोपीला पकडल्यानंतर स्वत: कशी चौकशी करतात ते प्रत्यक्षात गुन्ह्य़ाच्या तपासासाठी जाताना त्या कशा वावरतात, याची इत्थंभूत माहिती राणीने रासम यांच्याकडून करून घेतली.
प्रत्यक्षात आरोपीची चौकशी कशी केली जाते हे पाहायचे आहे, असा तगादा राणीने लावला. मग रासम यांनी राणीसह आलेल्या त्यांच्यातीलच एकाला आरोपी बनविले आणि आपल्या पद्धतीने चौकशी सुरू केली. चौकशीच्या या पद्धतीने समोरचाही गांगरून गेला आणि राणीही खूश झाली. तिने आनंदाने रासम यांचा हात हातात घेतला आणि चक्क ओरडलीच. ‘‘हात इतका कडक.. बापरे, हा हात कोणावर उठला तर नक्कीच तो गार होईल’’..इति रानी.
पोलीस दलातील आणखी काही महिला अधिकाऱ्यांना आपण भेटणार आहोत. प्रत्येकाची कामाची पद्धत वेगवेगळी असल्यामुळे त्याचा आपल्याला भूमिका करताना नक्कीच फायदा होईल. गुन्हे अन्वेषण विभागाच्या आजच्या अनुभवानंतर आपण ही भूमिका अधिक सशक्तपणे करू शकू, असे राणीने या भेटीनंतर सांगितले.