दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत ‘जेलर’ चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. देशात जेलर चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी ( १८ ऑगस्ट ) रजनीकांत उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. रजनीकांत यांनी लखनऊ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. तेव्हा रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडले होते. यामुळे सर्व स्तरातून रजनीकांत यांना ट्रोल करण्यात येत होतं. यावर रजनीकांत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शनिवारी रजनीकांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानी पोहचले. त्यावेळी योगी आदित्यनाथ रजनीकांत यांच्या स्वागतासाठी हजर होते. गाडीतून उतरल्यानंतर रजनीकांत यांनी थेट योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडले. याचा व्हिडीओ सोशल मीडियात खूप व्हायरल झाला होता. यानंतर रजनीकांत यांच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. रजनीकांत वयाने ज्येष्ठ असून योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडल्याने काहींना रुचलं नव्हतं.
याबद्दल चेन्नई विमानतळावर पत्रकारांनी रजनीकांत यांना प्रश्न विचारला. त्यावर आशीर्वाद घेणं ही माझी सवय असल्याचं रजनीकांत यांनी सांगितलं आहे. “योगी असो किंवा संन्याशी, जरी ते माझ्यापेक्षा वयाने लहान असले, तरी त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेणं ही माझी सवय आहे. तेच मी केलं आहे,” असं रजनीकांत यांनी म्हटलं.
हेही वाचा : सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव रद्द; बँकेकडून तांत्रिक कारण
दरम्यान, ११ व्या दिवशी जेलर चित्रपटाने १८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. देशात जेलरने २८० कोटींची कमाई केली. तर, जगभरात ५५० कोटींहून अधिक गल्ला जेलर चित्रपटाने जमा केला आहे. रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटाला देशात आणि जगात चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.