प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) ‘द इंडियाज गॉट लेटेंट’ (India’s Got Latent) या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलाच चर्चेत आला होता. त्याने पालकांबद्दल केलेल्या अश्लील टिप्पणीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. या वादानंतर रणवीरने आपल्या विधानाबाबत माफीदेखील मागितली. मात्र, ऑनलाईन माध्यमांवर अशा प्रकारचा मजकूर जाणे सामाजिक नैतिकतेला धरून नसल्याचे म्हणत सर्वच स्तरांतून त्याच्यावर टीका करण्यात आली होती.

या सर्व प्रकरणानंतर रणवीरने आता एक नवीन सुरुवात केली आहे. त्याने पुन्हा एकदा आपले पॉडकास्ट सुरू केले असून, वादानंतरचा पहिला व्हिडीओ त्याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. या संदर्भात त्याने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. सोमवारी रणवीरने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक नवीन पॉडकास्ट शेअर केला, ज्यामध्ये तो बौद्ध भिक्षू पालगा रिनपोछे यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे.

‘इंडियाज गॉट लॅटेंट’ शोमधील वादानंतरची त्याची ही पहिलीच मुलाखत आहे आणि या मुलाखतीला अवघ्या काही तासांत लाखो व्ह्युज मिळाले आहेत. त्यामुळे रणवीरने पुन्हा एकदा त्याच्या क्षेत्रात कमबॅक केले आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्याशिवाय त्याच्या या कमबॅकचे अनेक चाहत्यांकडूनही स्वागत करण्यात आले आहे. अनेकांनी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

या पॉडकास्टमध्ये रणवीर बौद्ध भिक्षू पालगा रिनपोछे यांच्याबरोबर झालेल्या भेटीची आठवण करून देतो. तेव्हा त्यांनी रणवीरला ज्ञान आणि करुणा यांचा खरा अर्थ शिकवला असल्याचे रणवीर म्हणतो. तर, बौद्ध भिक्षू पालगा रिनपोछे रणवीरचे कौतुक करीत म्हणतात, “तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून करीत असलेल्या कामाबद्दल मी आभारी आहे. मी नेहमीच प्रार्थना करेन की, तुम्ही हे उत्तम काम करीत राहा.”

यापुढे रणवीर अलाहाबादिया म्हणतो, “आपण आयुष्यात आधी दोनदा भेटलो आहोत आणि जेव्हा मी अडचणीत होतो, तेव्हा तुम्ही नेहमीच माझ्या मदतीला आला आहात. आज मी एका मोठ्या आव्हानाचा सामना करत आहे, ज्याचा सामना मी कधी करेन, असा विचार केला नव्हता. म्हणून मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्हाला पुन्हा एकदा भेटून खूप आनंद झाला. धन्यवाद!”

दरम्यान, ‘इंडियाज गॉट लॅटेंट’मधील वक्तव्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने रणवीरला कठोर शब्दांत सुनावलं होतं. “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली, समाजाच्या नियमांविरोधात बोलण्याचा कोणालाही परवाना मिळालेला नाही. आई-वडिलांना, बहि‍णींना लाज वाटेल असे तुमचे शब्द आहेत”, अशा शब्दांत न्यायालयाने रणवीरच्या विधानाचा समाचार घेतला होता.