Ranveer Allahbadia : गेल्या काही दिवसांपासून देशभरात ‘इंडियाज गॉट लेटेंट’ मधील आक्षेपार्ह विधानांमुळे रणवीर अलाहबादीया हे नाव चर्चेत आहे. युट्यूबर आणि कॉमेडियन समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. मात्र, या कार्यक्रमात यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याने तो वादात सापडला आहे. यावरून सोशल मीडिया वापरकर्त्यांसह विविध क्षेत्रातील लोकांकडून टीका करण्यात आली आहे. यावरून रणवीर अलाहाबादियाने माफी देखील मागितली. मात्र, आता रणवीर अलाहाबादियाला महाराष्ट्र सायबर सेलने २४ फेब्रुवारीला हजर राहण्यासाठी समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.
रणवीर अलाहाबादियाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या वेब शोमध्ये पालक आणि लैंगिक संबंधांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादिया आणि इतरांविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास एजन्सींकडून करण्यात येत आहे. रणवीर अलाहबादियाने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणातील अनेकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत.
युट्युबर समय रैना हा परदेशात असल्याने त्याने आपली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, त्याची ही मागणी देखील महाराष्ट्र सायबर विभागाने फेटाळली आहे. तसेच १८ फेब्रुवारीपर्यंत वैयक्तिकरित्या उपस्थित राहून जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
कोण आहे समय रैना?
समय रैना हा एक स्टँड-अप कॉमेडियन आहे, जो त्याच्या ‘डार्क’ कॉमेडी शैलीसाठी ओळखला जातो. जम्मू आणि काश्मीरमध्ये एका काश्मिरी पंडित कुटुंबात जन्मलेल्या समय रैना याने वयाच्या १६ व्या वर्षी यूट्यूबवर कॉमेडी व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केली होती.
रणवीर अलाहाबादियाच्या विधानाने वाद
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंडियाज गॉट लेटेंटमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मोठा गोंधळ उडाला. रणवीर अलाहाबादियासह कार्यक्रमाचा होस्ट समय रैना, आशीष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा माखिजा यांच्या विरोधात अनेक पोलिस तक्रारी दाखल करण्यात आल्या. शोमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन देणे आणि अश्लील चर्चा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
‘इंडियाज गॉट लेटेंट’ काय आहे?
जून २०२४ मध्ये, रैनाने इंडियाज गॉट टॅलेंट या टीव्ही रिॲलिटी शोसारखा ‘इंडियाज गॉट लेटेंट’नावाचा विनोदी कार्यक्रम आपल्या यूट्यूबवर सुरू केला. या कार्यक्रमात येणारे स्पर्धक त्यांची प्रतिभा प्रदर्शित करतात आणि नंतर पॅनेलवरील मंडळी स्पर्धकांना रोस्ट करतात, म्हणजेच त्यांच्यावर टिप्पणी करतात. या पॅनेलमध्ये रैना याने आमंत्रित केलेल्या इतर पाहुण्यांचा समावेश असतो. स्पर्धा जिंकण्यासाठी स्पर्धकांनी एकमेकांशी स्पर्धा करण्याऐवजी आत्मजागरूक असणे आवश्यक असते. एक अनोखी स्कोअरिंग प्रणाली असलेला हा शो काहीसा कॉमेडियन टोनी हिंचक्लिफच्या अमेरिकन कॉमेडी पॉडकास्ट किल टोनीसारखा आहे. त्याचा पहिला भाग सुमारे सात महिन्यांपूर्वी यूट्यूबवर प्रसारित झाला होता आणि त्याला प्रचंड प्रेक्षकसंख्या मिळाली होती. या कार्यक्रमाच्या यशानंतर, समयने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ ॲपदेखील लॉंच केला, ज्यात सेन्सॉर नसलेली सामग्री पहायला मिळते.