Ranveer Allahbadia Apology Video : समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने एक आक्षेपार्ह विधान केलं. त्यानंतर त्याच्यावर चौफेर बाजूंनी टीका होत आहे. त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अशातच रणवीरने एक व्हिडीओ पोस्ट करून घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.
रणवीर अलाहाबादियाने समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये केलेल्या त्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. “मी इंडियाज गॉट लेटेंटमध्ये जे बोललो ते मी बोलायला नको होतं. मला माफ करा. माझी टिप्पणी फक्त चुकीचीच नव्हती, तर मजेदारही नक्कीच नव्हती. कॉमेडी मला जमत नाही, मी इथे फक्त सॉरी म्हणायला आलो आहे”, असं रणवीर म्हणाला. शोमधील तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर होणाऱ्या टीकेदरम्यान रणवीरने त्याचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
रणवीर पुढे म्हणाला, “जे काही घडलं त्यामागील कोणतेही संदर्भ किंवा कोणतेही स्पष्टीकरण देणार नाही. मी इथे फक्त माफी मागायला आलो आहे. माझ्याकडून चूक झाली. मी ते बोलायला नको होतं. पॉडकास्ट सर्व वयोगटातील लोक पाहतात, मला जबाबदारीचं भान नसलेली व्यक्ती व्हायचं नाही. कुटुंब ही शेवटची गोष्ट आहे ज्याचा मी कधीही अनादर करेन. मला या प्लॅटफॉर्मचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करायचा आहे, हेच मी माझ्या अनुभवांमधून शिकलोय. मी निर्मात्यांना व्हिडीओतील असंवेदनशील विधानं हटवण्यास सांगितलं आहे. पुन्हा एकदा मी माफी मागतो, तुम्ही सगळे मला माफ कराल, अशी आशा आहे.” रणवीरने त्याच्या व्हिडीओमध्ये सर्वांची माफी मागितली आहे. जे विधान केलं ते अजिबात चांगलं नव्हतं आणि आपल्याकडून चूक झाली, असंही रणवीरने म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ
रणवीर अलाहाबादिया काय म्हणाला होता?
रणवीर स्पर्धकाला म्हणाला, “तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल?” यापैकी कोणताही एक पर्याय निवडायला रणवीरने सांगितलं. रणवीरचा प्रश्न ऐकल्यानंतर समय रैना म्हणतो की हे सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न आहेत.