Ranveer Allahbadia Comment Controversy : प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमधील त्याच्या वक्तव्यामुळे अडचणीत आला आहे. रणवीर अलाहाबादिया याने केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर सर्वच क्षेत्रातून टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियावर देखील संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मनोरंजन विश्वासह राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनीही त्याच्या वक्तव्यावरून टीका होत आहे. आता राष्ट्रीय महिला आयोगानेही रणवीर अलाहाबादियाच्या विधानाची गंभीर दखल घेतली आहे.
रणवीर अलाहाबादियाने अपमानजनक आणि वर्णद्वेषी केलेल्या टिप्पणीबद्दल समन्स बजावले आहेत. रणवीर अलाहाबादियासह समय रैना आणि इतरांना हे समन्स बजावले आहेत. रणवीर अलाहाबादियासह आदींवर असभ्य आणि आक्षेपार्ह टिप्पण्यांबाबत आयोगाने गंभीर दखल घेतल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाने एका निवेदनात म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त इकोनॉमिक्स टाईम्सने दिलं आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या सूचनेनुसार ‘इंडियाज गॉट लेटेंटवर’शोमध्ये केलेल्या वादग्रस्त टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर समन्स बजावण्यात आले आहेत. त्यामुळे आता रणवीर अलाहाबादिया, समय रैना, सुश्री अपूर्व मखिजा, आशहर सिंह, श्रीमान जयकुमार, पुजारी आणि सौरभ बोथरा यांना राष्ट्रीय महिला आयोगासमोर १७ फेब्रुवारी रोजी हजर राहावं लागणार आहे.
हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात कसा अडकला?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंडियाज गॉट लेटेंटमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मोठा गोंधळ उडाला. रणवीर अलाहाबादियासह कार्यक्रमाचा होस्ट समय रैना, आशीष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा माखिजा यांच्या विरोधात अनेक पोलिस तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. शोमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन देणे आणि अश्लील चर्चा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
NCW takes serious note of derogatory & racist remarks made on 'India’s Got Latent' show
— NCW (@NCWIndia) February 11, 2025
Chairperson Smt. Vijaya Rahatkar @VijayaRahatkar has issued summons to Ranveer Allahabadia, Samay Raina, Apoorva Makhija, Jaspreet Singh, Ashish Chanchlani, Tushar Poojari & Saurabh Bothra…
कोण आहे समय रैना?
समय रैना हा एक स्टँड-अप कॉमेडियन आहे, जो त्याच्या ‘डार्क’ कॉमेडी शैलीसाठी ओळखला जातो. जम्मू आणि काश्मीरमध्ये एका काश्मिरी पंडित कुटुंबात जन्मलेल्या समय रैना याने वयाच्या १६ व्या वर्षी यूट्यूबवर कॉमेडी व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केली. त्याने महाराष्ट्रातील पुण्यातील सीओईटीमध्ये प्रिंट इंजिनीअरिंग कोर्समध्ये प्रवेश घेतला. परंतु त्याला त्यात रस वाटत नसल्याने त्याने ओपन माइक इव्हेंटमध्ये परफॉर्म करण्यास सुरुवात केली. त्याची पहिली ओपन माइक गिग ऑगस्ट २०१७ मध्ये आली. त्याने सहकारी स्पर्धक आकाश गुप्तासोबत कॉमिकस्टान या स्टँड-अप स्पर्धेचा दुसरा सीझन जिंकला तेव्हा तो प्रसिद्धीच्या झोतात आला.
‘इंडियाज गॉट लेटेंट’ काय आहे?
जून २०२४ मध्ये, रैनाने इंडियाज गॉट टॅलेंट या टीव्ही रिॲलिटी शोसारखा ‘इंडियाज गॉट लेटेंट’नावाचा विनोदी कार्यक्रम आपल्या यूट्यूबवर सुरू केला. या कार्यक्रमात येणारे स्पर्धक त्यांची प्रतिभा प्रदर्शित करतात आणि नंतर पॅनेलवरील मंडळी स्पर्धकांना रोस्ट करतात, म्हणजेच त्यांच्यावर टिप्पणी करतात. या पॅनेलमध्ये रैना याने आमंत्रित केलेल्या इतर पाहुण्यांचा समावेश असतो. स्पर्धा जिंकण्यासाठी स्पर्धकांनी एकमेकांशी स्पर्धा करण्याऐवजी आत्मजागरूक असणे आवश्यक असते. एक अनोखी स्कोअरिंग प्रणाली असलेला हा शो काहीसा कॉमेडियन टोनी हिंचक्लिफच्या अमेरिकन कॉमेडी पॉडकास्ट किल टोनीसारखा आहे. त्याचा पहिला भाग सुमारे सात महिन्यांपूर्वी यूट्यूबवर प्रसारित झाला होता आणि त्याला प्रचंड प्रेक्षकसंख्या मिळाली होती. या कार्यक्रमाच्या यशानंतर, समयने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ ॲपदेखील लॉंच केला, ज्यात सेन्सॉर नसलेली सामग्री पहायला मिळते.