Ranveer Allahbadia युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्या अडचणींमध्ये आणखी भर पडल्याचं दिसून येतं आहे. कारण आता आसाम या राज्यात रणवीर, आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह, अपूर्वा मखीजा, समय रैना यांच्यासह आणखी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.
आसाम पोलिसांनी काय म्हटलं आहे?
आसाम पोलिसांनी स्टँड अप कॉमेडियन समय रैनाचा शो इंडियाज गॉट लेटेंट च्या नुकत्याच पार पडलेल्या भागामध्ये अश्लीलता पसरवण्यात आली. या चर्चेत रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि इतर इन्फ्लुएनसर्स सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात अश्लीलता पसरवल्यासंबंधीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिमंता बिस्वा सरमांची पोस्ट काय?
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या संदर्भातली माहिती पोस्ट करुन दिली आहे. आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह, अपूर्वा मखीजा आणि इतरांनी अश्लीलता वाढवली आहे. यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं म्हटलं आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सदर कंटेट युट्यूबवरुन हटवण्यासाठी त्यांना नोटीस बजावली आहे. तर रणवीर अलाहाबादिया हा प्रचंड ट्रोल होतो आहे. सोशल मीडियावर रणवीरला लोक प्रचंड ट्रोल करत उपदेशाचे डोस पाजत आहेत.
NHRC ने काय म्हटलं आहे?
NHRC ने अर्थात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने युट्यूबला नोटीस पाठवली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पाठवलेल्या नोटिशीमुळे रणवीरच्या अडचणींत भर पडली आहे. युट्यूबला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पत्र लिहिलं आहे आणि हा व्हिडीओ हटवण्याचे निर्देश दिले आहेत. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने रणवीर ( Ranveer Allahbadia ) अडचणींत सापडला आहे. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे.
रणवीरने नेमकं काय म्हटलं होतं?
इंडिया गॉट लेटेंटमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला प्रश्न विचारला की तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल? त्याच्या या प्रश्नावर समय रैनाने सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न असल्याचे म्हटले. रणवीरच्या याच प्रश्नामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
कोण आहे रणवीर अलाहाबादिया?
रणवीर अलाहाबादिया ( Ranveer Allahbadia ) हा प्रसिद्ध युट्यूबर असून तो ‘बीयरबाइसेप्स’ म्हणून देखील ओळखला जातो. त्याचा पॉडकास्ट शो सर्वाधिक चर्चेत असते. अनेक मान्यवरांनी त्याच्या पॉडकास्टला उपस्थिती लावली आहे. त्याने मुंबईतील ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’मधून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर रणवीरने त्याचं उच्च शिक्षण ‘द्वारकादास जे सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ येथून पूर्ण केलं आहे. रणवीरने शाळेत असतानाच युट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. तो एकूण तो ७ यूट्यूब चॅनेल चालवतो. ‘बीयरबाइसेप्स’ हे त्याचं युट्यूब चॅनेल चाहत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. या चॅनेलचे तब्बल १२ मिलियन फॉलोअर्स आहेत.