कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून युट्यूबर रणवीर अलाहाबादिया सर्वत्र चर्चेत आहे. शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला पालकांच्या प्रायव्हसीबद्दल प्रश्न विचारला होता. शोमधील हा व्हिडीओ व्हायरल होताच रणवीरवर सर्व स्तरांतून टीका होऊ लागली. एवढंच नव्हे तर त्याच्याविरोधात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली.

यानंतर रणवीरने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत सर्व चाहत्यांची व नेटकऱ्यांची माफी मागितली होती. याशिवाय समय रैनाने देखील ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व शो युट्यूबवरून हटवतोय असं स्पष्टीकरण देत सर्वांची माफी मागितली. सध्या या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. रणवीर अलाहाबादिया, समय रैना, अपूर्वा मखीजा, आशीष चंचलानी यांची वैयक्तिक चौकशी देखील सुरू आहे.

या चौकशीदरम्यान रणवीर अलाहाबादियाने त्याचा फोन बंद केला असून तो बेपत्ता झालाय, अशा चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. पण आता रणवीरने स्वतः पुढे येऊन या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. रणवीरने एक पोस्ट शेअर करत आपली बाजू सोशल मीडियावर मांडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असून, आईच्या दवाखान्यावर काही लोकांनी हल्ला केल्याचा दावा रणवीरने या पोस्टमध्ये केला आहे.

रणवीर अलाहाबादियाची पोस्ट

रणवीर लिहितो, “मी आणि माझी संपूर्ण टीम पोलीस तसेच अन्य तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत. मी सगळ्या नियमांचं पालन करून सर्वांसाठी उपलब्ध राहत आहे. पालकांबाबत मी केलेलं वक्तव्य हे असंवेदनशील आणि वरिष्ठांचा अनादर, अपमान करणारं होतं. पण, इथून पुढे चांगलं काम करणं ही माझी नैतिक जबाबदारी असेल…घडल्या प्रकाराबद्दल मी मनापासून माफी मागतो.”

“पण, गेल्या काही दिवसांपासून माझ्या कुटुंबीयांना या सगळ्या प्रकरणाचा मानसिक त्रास होत आहे. लोक जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. लोकांना मला मारून माझ्या कुटुंबीयांना दु:ख द्यायचं आहे. काही लोक रुग्ण असल्याचं भासवून माझ्या आईच्या दवाखान्यात घुसले होते. त्यांनी क्लिनिकवर हल्ला केला. मी प्रचंड घाबरलोय आणि मला नाही माहिती की काय केलं पाहिजे. मी पळून जात नाहीये मला पोलिसांवर आणि भारताच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.” असं रणवीर अलाहाबादियाने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मोठा गोंधळ उडाला. रणवीर अलाहाबादियासह कार्यक्रमाचा होस्ट समय रैना, आशीष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मखीजा यांच्या विरोधात अनेक पोलिस तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. शोमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन देणे आणि अश्लील चर्चा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Story img Loader