Ranveer Allahbadia row : महाराष्ट्र सायबर पोलीस विभागाने आता कॉमेडियन तन्मय भट, अभिनेत्री राखी सावंत, इंटरनेटवर जिची चर्चा असते ती उर्फी जावेद, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी, सोशल मीडिया सेलिब्रिटी दीपक कलाल या सगळ्यांना समन्स बजावले आहेत. रणवीर अलाहबादियाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यानंतर आता महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने या सगळ्या सेलिब्रिटींनाही समन्स बजावले आहेत.
पोलीस अधिकाऱ्याने नेमकं काय सांगितलं?
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला हे सांगितलं की आम्ही प्रसिद्ध युट्यूबर्स, कॉमेडियन्स, इन्फ्लुएन्सर्स या सगळ्यांना समन्स बजावलं आहे. समय रैनाच्या शोमध्ये हे सगळेजण जज म्हणून बसले होते. त्यामुळे आम्ही ही कारवाई केली आहे. कॉमेडियन अमित टंडन, नीती पलटा, मनदीप सिंग, आशिष सोलंकी, विपुल गोयल, निशांत तनवर, सोनाली ठक्कर, भारती सिंग, हर्ष लिंबचिया, पूनम पांडे या सगळ्यांचीही रैनाच्या शोमध्ये उपस्थिती होती.
रणवीर अलाहाबादियाने नेमकं काय म्हटलं होतं?
इंडियाज गॉट लेटेंट नावच्या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने वादग्रस्त वक्तव्य केलं ज्यानंतर वादाला तोंड फुटलं. रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला प्रश्न विचारला की तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल? त्याच्या या प्रश्नावर समय रैनाने सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न असल्याचे म्हटले. रणवीरच्या याच प्रश्नामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. या सगळ्यानंतर रणवीरने माफीही मागितली. मात्र त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
समय रैनाच्या विरोधात एका महिलेने पोलिसांत केली तक्रार
समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया जे बोलले त्याची क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यानंतर सन्मिती पांडे या ३८ वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सोमवारी रणवीरच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे कंटेट क्रिएटर आशिष चंचलानी, इन्फ्लुएन्सर अपूर्व मुखेजा, क्रिएटर समय रैना यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी ३० जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये कलाकार, जजेस, इन्फ्लुएन्सर्स, शो ज्यांनी ठेवला ते आयोजक या सगळ्यांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. काहींना समन्सही बजावले आहेत. तसंच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एकाने अरुणाचल प्रदेशातले लोक कुत्र्याचं मांस खातात असंही विधान केलं होतं. त्यासंदर्भातला गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.