बॉलीवूडच्या बहुचर्चित ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटाचा नवा ट्रेलर शुक्रवारी प्रदर्शित झाला. या ट्रेलरचे वर्णन मोहक, आकर्षक आणि मंत्रमुग्ध करून टाकणारा असे करता येईल. मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णकाळ असणाऱ्या पेशव्यांच्या साम्राज्याची भव्यता या ट्रेलरमध्ये दिसून येते. याशिवाय, बाजीराव, मस्तानी, काशीबाई या प्रमुख पात्रांच्या पडद्यावरील व्यक्तिरेखाही मोहवून टाकणाऱ्या आहेत. लढाईतील रोमांचक प्रसंग, पेशव्यांच्या दरबारातील राजेशाही ऐश्वर्य, बाजीराव-मस्तानीच्या उत्कट प्रेमकहाणीची झलक या ट्रेलरमधून पहायला मिळते.
गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटातील एका गाण्यावरून संजय भन्साळी यांच्यावर बरीच टीका होत आहे. या चित्रपटातील अनेक ऐतिहासिक संदर्भ चुकीचे असल्याचे आक्षेप घेणाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट म्हणजे बाजीरावाचा चरित्रपट नव्हे. तर बाजीराव-मस्तानीच्या प्रेमकथेने प्रभावित होऊन हा चित्रपट बनवण्यात आला आहे. तो ना. स. इनामदारांच्या ‘राऊ’ या कादंबरीवर बेतला असल्याचे स्पष्टीकरण निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिले होते.