बॉलिवूडमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. रणवीरने दीपिकासाठी असलेलं प्रेम नेहमीच मोकळेपणाने व्यक्त केलं आहे. इतरांप्रमाणेच त्याचीही सर्वोत्तम पती होण्याची धडपड सुरू आहे. आता त्यासाठी त्याने बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूरची मदत घेतली आहे. करिनाच्या रेडिओ शोदरम्यान रणवीरने तिच्याकडून चांगला पती होण्यासाठी काय करावं लागतं याबाबत सल्ला घेतला आहे.

‘माझं नुकतंच लग्न झालं आहे, त्यामुळे उत्तम पती व्हावं यासाठी मी काय करावं ते मला सांग,’ असं रणवीरने करिनाला विचारलं. त्यावर करिना म्हणाली, ‘दीपिकावर तू किती प्रेम करतोस हे संपूर्ण देशाला माहीत आहे. तुला खरंतर कोणत्याच सल्ल्याची, टीप्सची गरज नाही. दीपिकावर तू ज्याप्रमाणे प्रेमाचा वर्षाव करतोस, ते पाहून अनेकांनाच हेवा वाटतो. पण एक गोष्ट मी तुला नक्की सांगेन की नात्यातील एकमेकांचा स्वातंत्र्य टिकवण्याचा प्रयत्न करा. बाकी सर्व गोष्टी तुम्हाला मिळतीलच.’

करिनाने दिलेल्या या मोलाच्या सल्ल्याबद्दल रणवीरनेही तिचे आभार मानले. दरम्यान, करिना आणि रणवीर आगामी ‘तख्त’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात रणवीर, करिनासोबतच अनिल कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर यांच्या भूमिका आहेत. याव्यतिरिक्त करिना सध्या ‘गुड न्यूज’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

Story img Loader