रणवीर सिंग कधी काय करेल याचा नेम नसतो, त्याचा जबदस्त उत्साह हा इतर कोणत्याही अभिनेत्यापेक्षा खचितच वरचढ पाहायला मिळतो. एखादी गोष्ट मनात आली की ती करून मोकळं व्हायचं हे रणवीरला चांगलंच ठावूक आहे. मग भर रस्त्यात गाडी थांबवून नाचणं असो किंवा कोणाच्याही लग्नात विनाआमंत्रण जाणं असो त्याचा तो बिंधास्तपणा त्याच्या चाहत्यांना खूपच आवडतो. अनेकांना तो आपल्यातलाच एक वाटतो. तर अशा या रणवीरचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘सिम्बा’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहण्यासाठी रणवीर थेट वांद्र्याच्या गेटी गॅलेक्सी चित्रपटगृहात पोहोचला. प्रेक्षकांकडून चित्रपटातल्या दृश्यांवर मिळणाऱ्या शिट्टया आणि टाळ्यांचा कडकडाट पाहून रणवीरही खूश झाला. हा आनंद इतका होता की रणवीर थेट चित्रपटगृहाच्या छतावर जाऊन चढला. चित्रपट पाहायला आलेल्या प्रेक्षकांशी त्यानं छतावर चढून संवाद साधला, चित्रपटातील गाण्यावर शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत ठेकाही धरला.
रणवीरची ती अनपेक्षित उपस्थिती त्याच्या चाहत्यांसाठी भेट ठरली. रणवीरच्या उपस्थितीचा मनमुराद आनंद चाहत्यांनी लुटला. त्याला पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी चित्रपटगृहाबाहेर जमली होती. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात रणवीरसोबत सारा अली खान प्रमुख भूमिकेत आहे. चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जवळपास १८ ते २५ कोटींची कमाई पहिल्याच दिवशी केली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.