‘राम-लीला’ चित्रपटातील रणवीर आणि दीपिकाच्या जोडीला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली असून, त्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहायला त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल. सर्व काही ठीक झाले तर संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या आगामी चित्रपटात दीपिका आणि रणवीर एकत्र दिसू शकतात. भन्साळींच्या बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात बाजिरावांच्या प्रमुख भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि संजय लीला भन्साळी यांच्यात बोलणी सुरू आहेत. बाजीराव पेशवे यांनी मराठा साम्राज्याचे झेंडे अटकेपार लावले होते. त्याशिवाय, बाजीराव आणि मस्तानीची प्रेमकथा देखील प्रसिद्ध आहे. बाजीराव आणि त्यांची प्रेमिका मस्तानीवर चित्रपट बनवण्याची योजना भन्साळी गेल्या १५ वर्षांपासून आखत आहेत. ‘हम दिल दे चुके सनम’ या त्यांच्या चित्रपटातील सलमान खान आणि ऐश्वर्या राय या प्रमुख जोडीला घेऊन त्यांना हा चित्रपट बनवायचा होता.
परंतु, आता रणवीर सिंग बाजीरावांची भूमिका साकारणार असून, या भूमिकेसाठी त्याला टक्कलदेखील करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाविषयीची बोलणी पुढे सरकली असून, जोपर्यंत सर्वकाही निश्चित होत नाही, तोपर्यंत आम्ही काहीही सांगू शकत नसल्याचे रणवीर सिंगचा प्रवक्ता म्हणाला. या आधी सदर भूमिकेसाठी शाहरूख खान, अजय देवगण आणि हृतिक रोशनसारख्या अनेक मोठ्या कलाकारांच्या नावांचा विचार करण्यात आला असला, तरी रणवीरच्या नावाला जास्त पसंती असल्याचे समजते. रणवीर सिंग आणि संजय लीला भन्साळी यांनी या आधी ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ चित्रपटासाठी एकत्र काम केले असून, या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील रणवीरची सह-अभिनेत्री दीपिका पदुकोण ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात मस्तानीची भूमिका साकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व काही व्यवस्थित झाल्यास पुढच्या वर्षी या चित्रपटाच्या कामाला सुरूवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा