भारताच्या इतिहासामध्ये २५ जून १९८३ ही तारीख सुवर्ण अक्षरामध्ये कोरली गेली. लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे १९८३च्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित ‘८३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार असून या चित्रपटातील आणखी एका भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे.

कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटामध्ये आतापर्यंत रणवीर सिंह मुख्य भूमिकेमध्ये झळकणार असल्याचं साऱ्यांनाच ठावूक होतं. त्यानंतर आता आणखी एका भूमिकेचा खुलासा झाला आहे. या चित्रपटामध्ये भारताचा माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता साकारणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या अभिनेत्याच्या नावाचा खुलासा केला आहे.

दाक्षिणात्य अभिनेता जीवा श्रीकांतच्या भूमिकेमध्ये झळकणार असून त्याने यादृष्टीने तयारीही सुरु केली आहे. या भूमिकेत हुबेहूब श्रीकांत सारखं दिसण्यासाठी जीवा सध्या जीममध्ये वर्कआऊट करत आहे. विशेष म्हणजे त्याने आतापर्यंत ७ किलो वजन कमी केलं आहे.

दरम्यान, आता एक-एक करत चित्रपटातील भूमिकांवरील पडदे दूर होत आहेत. काही दिवसांपूर्वीच पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली होती.

Story img Loader